योगायोग की, ठरवून केले ! फडणवीस आणि महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार चव्हाण यांची एकत्र ‘भरारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 11:08 PM2020-12-05T23:08:49+5:302020-12-05T23:10:14+5:30
दोघांनी औरंगाबाद येथून मुंबईचा एकत्रित विमान प्रवास केला
औरंगाबाद : विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी औरंगाबादहून मुंबईपर्यंत प्रवास एकाच विमानातून केला. या दोघांमध्ये एकाच सिटाचे अंतर म्हणजे एकप्रकारे सोशल डिस्टन्स होते. मात्र, या एकत्रित विमान प्रवासातून ‘ हा योगायोग की ठरवून केलेले बुकिंग’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या नूकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवणुकीत महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी विजयाची हट्रीक केली. या विजयानंतर ते प्रथमच शनिवारी एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत अभिजत देशमुख होते. याच विमानाने देवेंद्र फडणवीस यांनीही प्रवास केला. देवेंद्र फडणवीस हे हिंगोलीहून आले होते. योगायोग म्हणजे सतीश चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात केवळ एकच सीट रिकामे होते. दोघांमध्ये संवादही घडला. तो राजकीय होता की, अन्य हे मात्र, समजू शकले नाही. परंतु निवडणुकीतील जय-पराजयाच्या समिकरणानंतर या दोन नेत्यांच्या या विमान प्रवासाने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधान आले. या विमान प्रवासाचे छायाचित्रही सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले.