व्हीव्हीपॅटवरून सर्व विरोधक एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 05:17 AM2019-04-24T05:17:31+5:302019-04-24T05:17:49+5:30
५० टक्के मतांची मोजणी करा- चंद्राबाबू नायडू
मुंबई : निवडणूक आयोगाची विश्वासार्हता महत्त्वाची की मतांच्या मोजणीसाठी लागणारा वेळ; याचा निर्णय आयोगाने घ्यावा, त्यांनी धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसू नये, असे सांगत ५० टक्के व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी आयोगाने करण्याची विरोधी पक्षाची मागणी कायम आहे. त्यासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करत आहोत, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विरोधी पक्षांचे देशभरातील नेते हजर होते.
‘देश वाचवा, लोकशाही वाचवा’ या विषयाचे प्रेझेंटेशन नायडू यांनी दिले. सत्ताधारी पक्षाकडून ईडी, प्राप्तिकर विभाग, सीबीआयचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगही त्यास अपवाद नाही, असा आरोपही नायडू यांनी केला. प्राप्तिकर विभागाकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जात आहे. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशिनबरोबर छेडछाड होत आहे. ईव्हीएम मशिन मॅनिप्युलेट केली जाऊ शकते. १९१ देशांपैकी फक्त १८ देशांनी ईव्हीएम यंत्रणा वापरली आहे. यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात. व्हीव्हीपॅटसाठी ९ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मग त्यातील ५० टक्के मते मोजण्यावर खर्च करण्यास आयोगाचा विरोध का आहे. हे कळत नाही, असेही नायडू म्हणाले.
लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले आहे, परंतु ईव्हीएम मशिन हॅक करून किंवा ईव्हीएम मशिनमध्ये गडबड केली जाऊ शकते, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केली. पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आपचे खासदार संजय सिंग, सीपीआयचे महेंद्र सिंग, पीसीसीचे (आयएनसी) व्हाईस प्रेसिडेंट शांती चौहान, तृणमूल काँग्रेसचे खासदार नजमुल हक, इंडियन युनियन मुस्लीम लीगचे खोरुम ओमर, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे जनरल सेक्रेटरी डॉ. जी. एच. फर्नांडिस, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील, डीएमकेचे खासदार टी. के. एस. इलानगोवल, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि पक्षाचे सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
मॉक व्होटिंगमध्ये भाजपलाच मते
गोव्यात ईव्हीएम मशिनचे मॉक ड्रिल केले गेले. प्रत्येक पक्षाला ९-९ मते दिली गेली. मात्र, मतमोजणीचे बटन दाबले असता, भाजपला १७ मते मिळाल्याचे निदर्शनास आले, तर काँग्रेसला ९, आप पक्षाला ८ आणि अपक्षाला १ मते मिळाल्याची माहिती आपचे खा. संजय सिंग यांनी दिली.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टिष्ट्वट करून ३५० ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे सांगतानाच निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे, असा आरोप संजय सिंग यांनी केला.
पवारांना बारामती बंदी : बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. त्यानंतर शरद पवार यांनी येथील मतदार नसल्यामुळे मतदारसंघात राहू नये, अशी तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली. माझे मतदान मुंबईमध्ये असले तरी माझे घर बारामती आहे. त्यामुळे मी थांबू शकत होतो. परंतु निवडणूक आयोगाने आम्हाला थांबू दिले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.