भाजप व सेनेतील वादाला तक्रारींचे खतपाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:33 AM2021-03-29T08:33:40+5:302021-03-29T08:34:23+5:30
सध्या राज्यात भाजप व शिवसेनेत रंगलेला राजकीय कलगीतुरा हिंगोलीतही रंगत आहे. यावरून या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत आहेत.
सध्या राज्यात भाजप व शिवसेनेत रंगलेला राजकीय कलगीतुरा हिंगोलीतही रंगत आहे. यावरून या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत आहेत. एकमेकांच्या हितसंबंधाआड येताना तक्रारींद्वारे सूड उगविण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सदस्यांनी न.प.च्या बैठकीवर बहिष्कार घालताच भाजपने अवैध धंदे, वीज जोडण्या तोडू नये, असे मुद्दे काढून सत्ताधारी सेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
हिंगोली नगरपालिकेत थेट जनतेतून निवडून आलेले भाजपचे बाबाराव बांगर हे नगराध्यक्ष आहेत. दुसरीकडे सभागृहात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांचे संख्याबळ जास्त आहे. यापैकी राष्ट्रवादीचेही दिलीप चव्हाण संख्याबळावर उपनगराध्यक्ष झाल्याने राष्ट्रवादी अर्धी सत्तेतच आहे. काँग्रेसला न.प.त सत्तेत कोण आहे, याचा फरक पडत नाही. मात्र, भाजपकडून शिवसेनेला बऱ्याचदा सापत्न वागणूक मिळते, असा वारंवार आरोप होतो. यापूर्वीही शहरातील विकास कामांवरून शिवसेनेचे कळमनुरीचे आ. संतोष बांगर यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आ. बांगर यांनी मर्जीतील अधिकाऱ्यांची न.प.त वर्णी लावली. मध्यंतरी सगळे आलबेल असताना आ. बांगर यांचे बंधू तथा शिवसेना गटनेते यांनी अर्थसंकल्पीय बैठकीवर बहिष्कार टाकताना न. प. तील कामांच्या दर्जावर तसेच भूमिगत गटार योजनेच्या अर्धवट कामांबाबत प्रश्न उपस्थित केले. यावरून पुन्हा ठिणगी पडली. भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनीही सत्ताधारी सेनेला कोंडीत पकडताना जिल्ह्यात अवैध धंदे, वाळू उपसा जोमात सुरू आहे, असा आरोप करून निवेदने दिली. आंदोलनाचा इशारा दिला. महावितरण जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याने वसुलीला आलेल्यांना पिटाळून लावा, असे आवाहन केले. यामुळे पुन्हा भाजप व शिवसेनेतील वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
लोकप्रतिनिधींनीच खेचला निधी
जिल्हा वार्षिक योजनेत पुनर्विनियोजनात जिल्ह्यात वरिष्ठ लोकप्रतिनिधींनीच आपल्या कामांना प्राधान्य देत निधी खर्ची घातल्याचा आराेप जि.प.सदस्य व नगरसेवकांतून होत आहे. यामध्ये काँग्रेसने मात्र आपल्या जि.प.सदस्य, नगरसेवक, पक्ष पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य दिले. शिवसेना व राष्ट्रवादीत मात्र तसे न घडल्याने यावरून ओरड होत असल्याचे दिसून येत होते. यात आमदार व खासदारांनीच आपल्या कामांना प्राधान्य दिल्याची ही ओरड आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते मात्र शेवटपर्यंत निधी मिळावा, यासाठी लढा देताना दिसत होते.
पंचायत समित्यांत होतेय खांदेपालट
सध्या शिवसेना, काँग्रेसने एकापेक्षा जास्त जणांना संधी मिळावी म्हणून पंचायत समितीत खांदेपालटाची टूम काढली आहे. हिंगोली पंचायत समितीत काँग्रेसच्या उपसभापतीने राजीनामा दिल्यानंतर आता सेनेच्या सभापतींनीही राजीनामा दिला आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत येथे सत्ता स्थापन केली होती. आता हे दोन्ही पक्ष नवे पदाधिकारी देणार आहेत. त्याचबरोबर सेनगावातही शिवसेनेने सभापती पदाचा राजीनामा दिला. आता येथे काँग्रेसचा सभापती होणार असल्याची चर्चा आहे. निवडणुका वर्षभरावर आल्या असताना होत असलेल्या या बदलांतून काय साध्य होणार हा प्रश्नच आहे.