काँग्रेसची मदार मोदींविरोधी (सुप्त) लाटेवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:08 AM2019-04-19T05:08:12+5:302019-04-19T15:43:40+5:30
पुण्यातल्या मतदानाला आता दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.
- सुकृत करंदीकर
पुण्यातल्या मतदानाला आता दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. उमेदवार ‘निष्ठांवत’ हवा की ‘बाहेरचा’, ‘अमुक’ जातीचा सोईस्कर ठरेल की ‘तमूक’ जातीचा’ हा निर्णय घेण्यातच काँग्रेसने पुष्कळ वेळ खर्च केला. पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम यासारख्या पुण्याबाहेरच्या मंडळींनी पुण्यातल्या काँग्रेसची काळजी करावी, अशी निर्णायकी अवस्था पुण्याच्या काँग्रेसने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.
दुसरीकडे प्रतिस्पर्धी भाजपचा प्रचार खूप लवकर आणि पद्धतशीरपणे सुरू झाला आहे. दोन्हीकडील कागदोपत्री ताकदीमध्येही कमालीची विषमता असल्याचा परिणाम प्रचारात जाणवतो आहे. भाजपचे मित्रपक्ष शिवसेना, रिपाइं यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात जोमाने सहभागी झालेले दिसतात. काँग्रेसचा मुख्य मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते यांचे जास्त लक्ष शेजारच्या मावळ आणि बारामती मतदारसंघात केंद्रित झाले आहे. भाजपच्या बाजूने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांच्या प्रचारसभा एव्हाना पुण्यात झाल्या आहेत. पुण्याच्या काँग्रेसने मागणी करूनही त्याची वरिष्ठ पातळीवर अद्याप दखल घेतलेली दिसत नाही. परिणामी, शहर काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या पातळीवर बाजू सांभाळत आहेत. पुण्यालगत पण बारामती मतदारसंघात येणाऱ्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा काल सभा झाली. वातावरण निर्मितीसाठी ही सभा काँग्रेसला उपयोगाची ठरू शकेल.
भाजपचे उमेदवार गिरीश बापट यंदा त्यांच्या कारकिर्दीतली दहावी निवडणूक लढत आहेत. यातल्या आठ निवडणुका त्यांनी जिंकल्या आणि एकदाच ते पराभूत झाले. काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यापूर्वी एकदाच लढले व त्यात पराभव स्वीकारला. निवडणुकीचे व्यवस्थापन आणि जिंकण्यासाठीची साधने व मनुष्यबळ या तयारीत भाजपने तूर्तास आघाडी घेतली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशात सुप्त लाट असून मतदानातून ती व्यक्त होईल, या गृहीतकावर काँग्रेसचा प्रचारातील उत्साह टिकून आहे. पक्षांतर्गत नाराजी उफाळून येऊ नये व कोणी गाफील राहू नये याची काळजी भाजप घेत आहे. पुणेकरांचा कौल मात्र पंतप्रधान कोण, यासाठी असणार आहे. त्यामुळे प्रचारात केंद्र सरकारच्या कामगिरीची चर्चा अधिक होत आहे.
>अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांना भाजप सरकारने गती दिली. पुणे आणि पीएमआरडीए अंतर्गत वीस हजार कोटींची कामे, जायका, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्गाची मिळून २० हजार कोटींपेक्षा जास्त कामे तसेच पुणे मेट्रोची कामे गेल्या फक्त पाच वर्षांत सुरू झाली. हा विकास पुणेकरांना डोळ्यांनी दिसतो आहे.
- गिरीश बापट, भाजप
>पुण्याच्या विकासाच्या बाबत खोटी माहिती देऊन प्रचारात फेकुगिरी चालवली आहे. पुण्यातल्या स्मार्ट सिटीसाठी केंद्राने जेमतेम तीनशे कोटी रुपयेच दिले. खात्यात १५ लाख जमा झाले का, रोजगार मिळाला का, मेट्रो पुण्यातून धावली का? या सगळ्यांची उत्तरे ‘नाही’ आहेत. एकहाती सत्ता असूनही भाजपने काही केलेले नाही.
- मोहन जोशी, कॉँग्रेस
>कळीचे मुद्दे
लोकसंख्या, अर्थकारणाच्या दृष्टीने राज्यातले दुसरे शहर असणाºया पुण्यात नागरी सुविधांच्या आवश्यक योजना आणि प्रकल्पांची गेल्या अनेक वर्षांत अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे वाहतूककोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, शहरातून वाहणाºया मुठा नदीची स्वच्छता या समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे.