ते खातं कोणाचं? परवानगी कोणाची?; काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्याकडून फडणवीसांच्या चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 12:13 PM2021-04-19T12:13:56+5:302021-04-19T12:39:20+5:30
फडणवीस यांची कृती अतिशय लज्जास्पद; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची टीका
रेमडेसिविर प्रकरणात फडणवीसांची चौकशी होणार?; अडचणी वाढण्याची शक्यता
मुंबई: राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेसनंदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (congress leader digvijay singh demands inquiry of devendra fadnavis in connection with remdesivir)
राज्यांनी ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी, असं विधान रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केली. गोयल यांचं विधान म्हणजे मूर्खपणा असल्याची टीका काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली. ऑक्सिजनची मागणी गरजेवर आधारित असते. ती नियंत्रणात कशी राखली जाऊ शकते? कोरोना रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं डॉक्टर पहिल्या दिवसापासून सांगत आहेत, असं सिंह म्हणाले.
In fact Devendra Phadnavis should be investigated from which account he bought Remdesivir worth ₹4.5 crore and also with whose permission. It is absolutely shameful.
— digvijaya singh (@digvijaya_28) April 19, 2021
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. कोरोनाचा मुकाबला करताना सरकार सर्वच आघाड्यांवर कुचकामी ठरलं आहे, असं टीकास्त्र सिंह यांनी सोडलं. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला. 'फडणवीस यांनी कोणत्या खात्यातून ४.५ कोटी रुपयांचा रेमडेसिविरचा साठा मागवला, तो कोणाच्या परवानगीनं मागवला, याची चौकशी गरजेची आहे. त्यांची कृती अतिशय लज्जास्पद आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.