आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 07:50 PM2021-03-09T19:50:28+5:302021-03-09T19:53:23+5:30
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा घटना दुरुस्तीनंतर करण्यात आला असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीसांनी केल्याचा पटोलेंचा आरोप
"मराठा समाजाला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आरक्षण दिले. पण ते महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकवता येत नाही, अशी ओरड भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. परंतु भाजप व देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोटा असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान उघड झाले आहे," असं म्हणत काँग्रेसेचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षणासंदर्भात कुठलेही अधिकार राहिलेले नाहीत असे स्पष्ट केले. मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा हा या घटना दुरुस्तीनंतर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही शुद्ध फसवणूक असून मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांनी केंद्राला सांगून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे," अशी मागणीही पटोले यांनी केली.
"काँग्रेस पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असून त्यासंदर्भात मोठ्यातले मोठे वकील लावायचे असल्यास सरकारने लावावे व मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावरील राजकारण थांबवून केंद्रातील आपल्या पक्षाच्या सरकारला सांगून ठोस भूमिका घ्यावी व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. मराठा आरक्षणाचा गुंता हा भारतीय जनता पक्षानेच वाढवून ठेवला आहे. हे ८ मार्चला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतून उघड होत आहे. सामाजिक आणि आर्थिक मागास जातींना संविधानातील तरतूदीनुसार न्याय देण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून कायदा करण्याचा राज्यांचा अधिकारच केंद्र सरकारने काढून घेतला आहे हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आरक्षणच संपुष्टात आणावयाचे आहे हे लपून राहिलेले नाही. त्यासाठी अशी षडयंत्रे रचली जात आहेत. असा आरोपही पटोले यांनी केला.