IPLप्रमाणे कलाकारांच्या NCB चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचाही लिलाव करा; काँग्रेसचा सरकारला सल्ला
By कुणाल गवाणकर | Published: September 27, 2020 06:03 PM2020-09-27T18:03:18+5:302020-09-27T18:08:02+5:30
लिलावातून पैसे मिळतील, त्याचा वापर बिहारमध्ये होईल; काँग्रेसचा मोदी सरकारला उपरोधिक सल्ला
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा वापर होत असल्याचं समोर आलं. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं अनेक प्रख्यात कलाकारांना चौकशीसाठी बजावलं. सध्या दररोज बॉलिवूडमधल्या कलाकारांची चौकशी सुरू आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांचा समावेश आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्राला एक उपरोधिक सल्ला दिला आहे.
बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबी चौकशीतून मिनिटा-मिनिटाची माहिती बाहेर येत असून ती प्रसारमाध्यमांतून क्रिकेट कॉमेन्ट्रीसारखी ऐकवली जात आहे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. अशाच पद्धतीने चौकशी करायची असेल तर पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आपदा मे अवसर’ समजून आयपीएल प्रमाणे सीबीआय, ईडी, एनसीबीच्या चौकशीच्या थेट प्रक्षेपणाच्या हक्काचे लिलावच करून टाका. त्यातून सरकारच्या तिजोरीत काही पैसा तरी येईल, असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला.
मोदी सरकारची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. अशा परिस्थितीत मोदीजी या आपदेला संधीत बदलू शकतात. आपीएल प्रमाणे सीबीआय, ईडी व एनसीबीच्या चौकशीच्या थेट प्रक्षेपणाचे हक्कांचा लिलाव केला तर भाजपाचे आर्थिक व राजकीय दोन्ही हेतू साध्य होतील. नाहीतरी अप्रत्यक्ष प्रक्षेपण सुरुच आहे. pic.twitter.com/V4tNSTyvV2
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 27, 2020
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, एनसीबी सध्या बॉलिवूडमधल्या कलाकारांची चौकशी करत आहे. या चौकशी संदर्भातील सर्व माहिती बाहेर येत असून त्यांना कोणते प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले, त्यांनी काय केलं, कोण रडले, अशी सर्वच माहिती बाहेर येत आहे. अशा चौकशीमुळे पुढच्या गुन्हेगारालाही कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आधीच तयारी करण्यास त्याला मदत होणार आहे.
...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर
मोदी सरकारची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे या चौकशीच्या थेट प्रक्षेपणाचे हक्काच्या लिलाव केला तर पंतप्रधान केअर फंडात जमा झाली तेवढी रक्कम जमा झाली नाही तरी काहीतरी जमा होईलच. या सर्व प्रकरणांचा उपयोग भाजपाला बिहारच्या निवडणुकीत प्रचार करण्यासही उपयोगी पडेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होईल. त्यामुळे भाजपाचे आर्थिक व राजकीय दोन्ही हेतू साध्य होतील, असे सावंत म्हणाले.
फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक
सरकारचे अपयश लपवणे आणि मुख्य समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असा गैर मुद्द्यांचा गाजावाजा केल्यास भाजपाला फायदा होतो. मुख्य समस्यांकडे जनता लक्ष देणार नाही त्यासाठी अशा प्रक्षेपणाचा फायदा होईल. असे सर्व फायदे पाहता सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा असा उपरोधीक सल्लाही सावंत यांनी दिला आहे.