"शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत"; थेट सोनिया गांधींनाच पाठवलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:33 PM2020-12-30T12:33:59+5:302020-12-30T12:37:59+5:30

Congress : आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत असल्याचंही विश्वबंधू राय यांनी पत्रात नमूद केलं आहे.

congress leader vishwabandhu rai writes letter to sonia gandhi mahavikas aghadi government shiv sena ncp | "शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत"; थेट सोनिया गांधींनाच पाठवलं पत्र

"शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत"; थेट सोनिया गांधींनाच पाठवलं पत्र

Next
ठळक मुद्देवर्षभरात काय गमावलं काय मिळवलं या विषयावर सोनिया गांधींना मुंबई काँग्रेस महासचिवांचं पत्रसरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसत असल्याचाही पत्राद्वारे आरोप

राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि माजी खासदार संजय निरूपम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्रात राज्यात काँग्रेसला बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस पक्षानं काय मिळवलं आणि काय गमावलं असं म्हणत त्यांनी काही मुद्दे या पत्राद्वारे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या एका वर्षात काँग्रेस पक्ष सरकारमध्ये एक सहयोगी पक्ष म्हणूनच राहिला आहे. महाराष्ट्रात सरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप विश्वबंधू राय यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेस पक्षातील अनेक मंत्री संघटनेच्या कोणत्याही कामासाठी मदतीस येत नाही. सामान्य जनता आणि पक्षा कार्यकर्त्यांना मंत्र्यांच्या विभागाबद्दलही माहिती नाही. महाराष्ट्रात सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी राज्यातील अनेक विभाग, मंडळं आणि आयोगांवरील पद रिक्त आहेत. त्यावर आतापर्यंत नियुक्ती करण्यात आलेली नाही. आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत आहोत, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
 


२०१९ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस पक्षाद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनांवर कोणतंही काम केलं जात नाही. सर्व आश्वासनं तशीच राहिली असून आता एका वर्षाचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे. आपली मतं आपले सहकारी पक्ष आणि विरोधी पक्षा त्यांच्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहेत. पक्षातून अन्य पक्षात होणारे प्रवेश थांबवण्यासाठीही काही पावलं उचलणं आवश्यक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आघाडीच्या नियमांवर चालण्याच्या सूचना देणं आवश्यक असल्याचं विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

Web Title: congress leader vishwabandhu rai writes letter to sonia gandhi mahavikas aghadi government shiv sena ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.