काँग्रेसचा विधानपरिषद आमदार पॉर्न पाहत होता?; कर्नाटक विधानपरिषदेतील प्रकार कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 09:00 IST2021-01-30T08:49:41+5:302021-01-30T09:00:17+5:30
Karnatak Mlc porn : सदनातील कार्यवाहीवेळी राठोड त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतातरी व्हि़डीओ पाहताना दिसत आहेत. न्यूज चॅनलनी ते मोबाईलमध्ये पाहतानाचा व्हिडीओ ब्लर करून दाखविला

काँग्रेसचा विधानपरिषद आमदार पॉर्न पाहत होता?; कर्नाटक विधानपरिषदेतील प्रकार कॅमेऱ्यात कैद
बंगळुरू : कर्नाटकच्याविधानसभा पुन्हा एकदा पॉर्न प्रकरणाने डागाळली आहे. विधानपरिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड हे शुक्रवारी मोबाईल फोनवर अश्लिल चित्रफित पाहताना दिसले आहेत. कन्नड प्रसारमाध्यमांनी याबाबतचे दृष्य दाखविले आहे. मात्र, राठोड यांनी याबाबतचे आरोप फेटाळले आहेत.
सदनातील कार्यवाहीवेळी राठोड त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतातरी व्हि़डीओ पाहताना दिसत आहेत. न्यूज चॅनलनी ते मोबाईलमध्ये पाहतानाचा व्हिडीओ ब्लर करून दाखविला. या आधीही कर्नाटकच्या विधानसभेत काही आमदार पॉर्न व्हिडीओ पाहताना सापडले होते.
राठोड यांनी हे आरोप फेटाळताना सांगितले की, विधान परिषदेत प्रश्नकाळ सुरु होता. सरकारला प्रश्न विचारण्यासाठी मी त्याच्याशी संबंधित सामग्री पाहत होतो. तसेच फोनमधील स्पेस भरल्याने काही सामग्री डिलीट करत होतो. जेव्हा मी प्रश्नाशी फोटो, व्हिडीओ पाहत होतो, तेव्हा अनेक असे मेसेज होते ज्यामुळे मोबाईलची स्पेस वाया गेली होती. ते मी डिलीट करत होतो. आता तुम्ही काय पाहिले आणि काय दाखविले, मला माहिती नाही. मी अशा गोष्टी कधी करणार नाही, असेही ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.
याचप्रकारे 2012 मध्ये तीन मंत्री विधानसभेत कामकाजावेळी एकत्र मोबाईल फोनवर अश्लिल क्लिप पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. यानंतर तत्कालीन भाजपा सरकारला खूप टीका झेलावी लागली होती. भाजपाने अखेरीस या तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते.