राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली : राधाकृष्ण विखे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 11:14 AM2019-04-25T11:14:45+5:302019-04-25T11:15:16+5:30
राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे.
श्रीरामपूर : राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. काँग्रेससाठी ज्यांनी काहीच काम केले नाही ते आता काँग्रेस उभी करायला निघाले आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या वस्तीवर आयोजित केलेल्या ससाणे समर्थकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिर्डी मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय समर्थक आज जाहीर करणार आहेत.
विखे म्हणाले, ही राजकीय लढाई आपल्या अस्तित्वाची व अस्मितेची आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा. कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाची अपेक्षा ठेवू नये. काँग्रेस पक्षाने माझ्यावर कारवाई करावी यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. ज्या पक्षासाठी मी पाच वर्षे संघर्ष केला, सरकार विरोधी भूमिका घेतली तो पक्ष माझ्यासोबत नाही राहिला, तो तुमच्या मागे कधी राहील, असा सवाल विखे यांनी यावेळी उपस्थित केला.
राहाता तालुक्यातील गावांमध्ये गुरुवारी प्रचार करणार आहे. त्यावेळी राजकीय भूमिका स्पष्ट करू. करण ससाणे यांच्याशी भेटून चर्चा करणार आहे. जयंत ससाणे यांच्या निधनानंतर हा कार्यकर्त्यांचा गट अभेद्य राहिला. मेळाव्यातील गर्दीतून ताकद दिसत आहे. कुठल्याही साखर कारखाना, संस्थाशिवाय मजबूत संघटन उभे आहे. मी स्वत: ससाणे यांच्या कार्यालयात नेहमी भेट देऊन अडचणी सोडवणार आहे. ससाणे यांना राजकीय ताकद देऊ, असे ते म्हणाले.
दरम्यान, ससाणे समर्थकांनी काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय यावेळी घोषित केला. विखे यांनी कार्यकर्त्यांना राजकीय निर्णय घेण्याविषयी सांगताच उपस्थितांमधून जय महाराष्ट्रच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावर तुमच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे, असे सांगितले.
ससाणे समर्थक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, ज्ञानेश्वर मुरकुटे, नानासाहेब पवार, संजय छल्लारे, सुधीर नवले, भारती कांबळे, मुक्तार शाह, आंबेडकरी चळवळीतील नेते अशोक गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. ससाणे समर्थकांनी काँग्रेस उमेदवार कांबळे यांच्याविरोधात काम करणार असल्याची भूमिका जाहीर केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे हे मेळाव्यास अनुपस्थित होते. विखे हे आज ससाणे यांच्याशी चर्चा करणार आहेत.