काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोनिया गांधी संवाद साधणार; उद्धव ठाकरेही सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 11:28 AM2021-08-12T11:28:50+5:302021-08-12T11:29:59+5:30
राज्यसभेत झालेल्या प्रकारानंतर आज दिल्लीत विरोधकांनी संसदेपर्यंत मोर्चा काढला.
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सर्वसाधारण विमा सुधारणा विधेयकावर चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी विधेयकाची प्रत फाडून खुर्चीत फेकली त्यावरुन गदारोळ झाला. यावेळी राज्यसभेत मार्शलला पाचारण करण्यात आले. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
राज्यसभेत झालेल्या प्रकारानंतर आज दिल्लीत विरोधकांनी संसदेपर्यंत मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, विरोधकांची एकजूट आहे. २० ऑगस्टला सोनिया गांधी काँग्रेसच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही(CM Uddhav Thackeray)या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती राऊतांनी दिली.
The Opposition is united. On 20th August, Congress interim president Sonia Gandhi will speak to CMs of Congress-ruled states. Maharashtra CM Uddhav Thackeray will also take part in this meeting: Shiv Sena leader Sanjay Raut
— ANI (@ANI) August 12, 2021
तसेच राज्यसभेत जी घटना घडली त्यावर संजय राऊतांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. विरोधकांना घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे का? जेष्ठ नेते मल्लिकाजुर्न खरगे यांच्या चेंबरमध्ये विरोधकांची बैठक पार पडली. मार्शलच्या वेषात महिला खासदारांवर हल्ला केला गेला. जे लोक सभागृहात उभे होते ते पाहून पाकिस्तान बोर्डावर उभे असल्याचं वाटलं. ही संसदीय लोकशाहीची हत्या आहे. विरोधकांवर जितका हल्ला कराल तितक्या ताकदीने विरोधक पुढे येऊन तुमच्याशी लढतील. बाहेरच्या लोकांना मार्शल बनवून उभं केलं होतं असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.
The opposition didn't get a chance to present their views in Parliament. Yesterday's incident against women MPs was against democracy. It felt like we were standing at the Pakistan border: Sanjay Raut, leader, Shiv Sena pic.twitter.com/MZYeQ1Qju9
— ANI (@ANI) August 12, 2021
राज्यसभेत काय घडलं?
संविधान (१२७ वी दुरुस्ती) विधेयक, २०२१ सभागृहात मंजूर झाल्यावर साधारण विमा व्यवसाय (ष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावर आसनाच्या परवानगीने चर्चा सुरू झाली. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. साधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे, अशी मागणी करत गोंधळ घातला. परंतु गोंधळात सरकारने हे विधेयक मंजूर केले.
सरकारच्यावतीने दावा करण्यात आला की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातील मार्शल आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारवर विरोधी खासदारांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्या १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर विमा संबंधी विधेयक मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज संध्याकाळी ७.०४ पर्यंत अर्धा तास तहकूब करण्यात आले. गोंधळ घालणारे खासदार सभापतींच्या आसनाच्या अगदी जवळ आले आणि त्यांनी कागदपत्रे फाडली आणि हवेत आसनाकडे फेकून दिली.
हा लोकशाहीवर हल्ला - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "आपल्या ५५ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत (राज्यसभेत)महिला खासदारांवर ज्या प्रकारे हल्ला झाला आहे, ते कधीही पाहिले नाही. ४० हून अधिक महिला आणि पुरुषांना बाहेरून सभागृहात आणण्यात आले. हे वेदनादायक आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे.