बारामती अॅग्रोच्या माध्यमातून होतेय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, फोटो शेअर करून भाजपाचा पवार कुटुंबीयांवर निशाणा
By बाळकृष्ण परब | Published: January 24, 2021 03:34 PM2021-01-24T15:34:56+5:302021-01-24T15:37:18+5:30
Baramati Agro News : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरून आंदोलक शेतकऱ्यांबरोबरच देशातील प्रमुख विरोधी पक्ष कृषी कायद्यांवरून भाजपावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता भाजपानेही या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चांमधून या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने कृषी कायद्यांबाबतचा तिढा कायम आहे. आंदोलक शेतकऱ्यांबरोबरच देशातील प्रमुख विरोधी पक्ष कृषी कायद्यांवरून भाजपावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता भाजपानेही या मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी बारामती अॅग्रोची एक जाहिरात ट्विटरवर शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे.
शेतकरी आंदोलनामध्ये करार पद्धतीने शेती हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्या माध्यमातून देशातील शेती ही उद्योगपतींच्या घशात घालण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा दावा केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देताना अतुल भातखळकर यांनी बारामती अॅग्रोची ही जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीमध्ये करार शेतीचे फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये वर्षभर हमीभावाने खरेदी, क्रेडिटवर बियाणे, रोपांचा पुरवठा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे काही फायदे सांगण्यात आले आहेत.
शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कंपन्यांचे बॅनर पाहून आनंद झाला. हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे @RRPSpeakspic.twitter.com/pNtVX3Vmkt
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 24, 2021
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या ट्रॅक्टर मोर्चात लाखो शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढत कूच केली आहे.