शिवसेना-राष्ट्रवादी मंत्र्यांमध्ये कुरघोडी; उदय सामंतांविरोधात जितेंद्र आव्हाडांची तीव्र शब्दात नाराजी
By प्रविण मरगळे | Published: January 14, 2021 10:39 AM2021-01-14T10:39:00+5:302021-01-14T10:42:12+5:30
मंत्री उदय सामंत यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं स्पष्टीकरण दिलं.
मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तिन्ही पक्षाचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार आहे. परंतु सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकमेकांविरोधात नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या वाद सुरु झाला आहे. जितेंद्र आव्हाडांना कोणतीही कल्पना न देता गृहनिर्माण खात्याची बैठक उदय सामंत यांनी बोलवल्याने या वादाला तोंड फुटलं आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना तीव्र शब्दात याचा विरोध केला आहे. प्रोटोकॉलनुसार एखाद्या खात्याच्या मंत्र्याला स्वत:च्या खात्याबाबत बैठक घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु उदय सामंत यांनी मला कोणतीही कल्पना न देता माझ्या खात्याबाबत बैठक बोलावल्याचं मला कळालं, किमान माझ्या खात्याशी संबंधित बैठक घेताना मंत्र्यांनी मला कळवायला हवं होतं. अशा वागणुकीमुळे गैरसमज निर्माण होतात. एकमेकांना माहिती दिली तर आम्ही एकत्रित आणि निर्णायक पद्धतीने काम करू शकतो असं त्यांनी सांगितले.
तर मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं स्पष्टीकरण दिलं. मागील भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उद्योगमंत्र्याच्या परवानगीशिवाय पुण्यातील एमआयडीसीच्या जागेसंदर्भात बैठक बोलावली होती. त्यावेळी जमिनीमालकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश खडसेंनी अधिकाऱ्यांना दिले होते, त्यानंतर हे प्रकरण खूप गाजलं होतं.
एकनाथ खडसेंच्या या प्रकरणानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय परिपत्रक काढत प्रोटॉकोल पाळण्याचे आदेश दिले तसेच कोणताही मंत्री इतर खात्याच्या बैठका संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीविना घेऊ शकणार नाही असंही म्हटलं होतं. महाविकास आघाडी सरकारमधील वाद राज्यातील जनतेला नवा नाही, कधी काँग्रेसचं शिवसेनेसोबत तर शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी नाराजीची मालिका सुरूच असते. औरंगाबादचं नामांतरण असो वा कृषी कायद्याच्या अंमलबजावणी तर कधी पोलीस खात्यातील बदल्यांमुळे प्रत्येक मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.