महिन्याला ६० लाख डोस द्या, ३ महिन्यात सर्वांचं लसीकरण पूर्ण करतो; केजरीवालांनी मोदींना रोखठोक सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 07:32 PM2021-05-09T19:32:56+5:302021-05-09T19:33:42+5:30
Corona Virus Updates Delhi: दिल्लीतील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर रोखठोक प्रस्ताव ठेवला आहे.
Corona Virus Updates Delhi: दिल्लीतील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारसमोर रोखठोक प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून राजधानी दिल्लीतील सध्याच्या लसीकरणाचं वास्तव मांडलं आहे. दिल्लीला सध्या महिन्याला ६० लाख कोरोना विरोधी लसींची गरज आहे. या गरजेनुसार पुरवठा होत राहिला तर येत्या तीन महिन्यात दिल्लीतील सर्वांचं लसीकरण पूर्ण करुन दाखवतो, असं थेट आव्हान केजरीवाल यांनी स्वीकारलं आहे. (Corona Cases In Delhi Cm Arvind Kejriwal Demand 60 Lakh Anti Covid-19 Vaccine Dose For Vaccination Within Three Months To All)
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकला केंद्र सरकारनं दिल्लीसाठी मे ते जुलै या महिन्यांमध्ये दरमहिना ६० लाख लसींचा पुरवठा करावा असे आदेश द्यावेत. तीन महिन्यांत आमच्या मागणीनुसार पुरवठा केला गेला तर जुलैच्या अखेरपर्यंत दिल्लीतील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दिल्लीत १८ ते ४५ वयोगटातील ९३ लाख लोक आहेत. या वयोगटातील नागरिकांनाचा विचार केला गेल्यास दर महिन्याला ८३ लाख लसींची आवश्यकता असल्याचंही केजरीवालांनी सांगितलं.
दिवसाला १ लाख लोकांचं लसीकरण
दिल्ली सरकारकडून दिवसाला १ लाख लोकांचं लसीकरण केलं जात असल्याची माहिती केजरीवालांनी यावेळी दिली. लवकरच दिवसाला ३ लाख लोकांचं लसीकरण करण्याचा उद्देश आणि तयारी दिल्ली सरकारनं केली आहे. त्यामुळे आम्हाला दर महिन्याला ९० लाख कोरोना लसींची गरज भासेल. याशिवाय कोरोना लसींची किंमत समान हवी मग ती केंद्र सरकारनं खरेदी केलेली असो किंवा मग राज्य सरकारनं. लसीच्या किमतीत फरक केला जाऊ नये, अशीही मागणी केजरीवालांना केली आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसींच्या किमती जास्त असल्यानं फायद्यानुसार सरकारऐवजी खासगी रुग्णालयांनाच कंपन्यांकडून लस पुरवली जाऊ शकते. त्यामुळे भेदभाव होऊ न देता लसीच्या किमती समान असायला हव्यात, असं केजरीवाल म्हणाले.