Corona Vaccine:”...मग सकाळी पत्रकार परिषद गांजा ओढून घेतली होती का?”; गोपीचंद पडळकरांचा राजेश टोपेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:07 PM2021-04-29T17:07:46+5:302021-04-29T17:09:35+5:30
पुरेशा लसीचा साठा नसल्याने राज्यात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले होते.
सांगली – देशात तसेच राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेला सुरूवात होणार आहे. परंतु राज्यात लसीकरण मोहिमेवरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळच्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणार असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले त्यानंतर संध्याकाळच्या ४ वाजताच्या पत्रकार परिषदेत लसीकरण १ मे पासून होणार नाही म्हणाले. मग सकाळची जी प्रेस घेतली ती गांजा ओढून घेतली का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे.(BJP MLC Gopichand Padalkar Target Health Minister Rajesh Tope over Corona Vaccination)
पुरेशा लसीचा साठा नसल्याने राज्यात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले होते. त्यावर गोपीचंद पडळकरांनी टीकास्त्र सोडलं आहे. सकाळी आरोग्यमंत्री येत्या १ तारखेपासून १८ वर्षावरील लोकांचं लसीकरण करणार असं सांगतात. त्यानंतर ४ वाजता ती करता येणार नाही असं म्हणतात. हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचे. विचारसरणी एक नाही, कोणताही अजेंडा नसताना एकत्र आले आहेत अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
त्याचसोबत भाजपाची जिरवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले, पण भाजपाचं काम चांगलं असल्याने त्यांना ते करता आलं नाही. म्हणून आता सत्ताधारी महाराष्ट्रातील जनतेची जिरवत आहेत. राजकारण करण्यापेक्षा या सर्वामधून बाहेर येऊन राज्यातील मृत्यूचे दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असंही भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राजेश टोपे?
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारनं या वयोगटाला मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र सध्याच्या घडीला राज्याकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा नसल्यानं १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू करण्यास आरोग्यमंत्री टोपेंनी असमर्थता दर्शवली. देशात सध्या दोनच लसी उपलब्ध असल्यानं पर्याय उपलब्ध नाहीत. त्यातच लसींची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांकडे असलेला ५० टक्के साठा केंद्र खरेदी करणार आहे. तर उर्वरित ५० टक्के साठा राज्यं सरकार, खासगी कंपन्या, खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. त्यामुळे राज्यं सरकारांवर मर्यादा येत असल्याची माहिती टोपेंनी दिली. राज्यातील कोरोना लसीकरण ६ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे.
१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण १ मेपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र इच्छा असतानाही आम्हाला हे लसीकरण सुरू करता येत नसल्याचं टोपेंनी सांगितलं. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रं सुरू केली जातील. ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी १८ ते ४४ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.