Corona Vaccine: जर पाकिस्तानने हल्ला केला तर राज्यांवर सोडणार का? लसींवरून केजरीवालांचा केंद्राला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:37 PM2021-05-26T16:37:54+5:302021-05-26T16:38:45+5:30
Corona Vaccine central, state issue: राज्यांना कोरोना लस पुरविण्यास जगभरातील कंपन्यांनी नकार दिला आहे. यामुळे राज्यांतील 18-44 वयोगटाचे लसीकरण ठप्प झाले आहे. यावर अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला सुनावले आहे.
राज्यांना लसीच्या बाबतीत केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करून गेल्या चार दिवसांपासून 18 ते 44 वयाच्या नागरिकांचे लसीकरण बंद आहे. हे एकट्या दिल्लीतच नाही तर देशभरातील चित्र आहे. नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यापेक्षा आम्हाला आहेत तीच बंद करावी लागत आहेत, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर केली.
राज्यांना जगभरातील कंपन्या कोरोना लस पुरविण्यास तयार नाहीत. केंद्राने हात वर केले आहेत. केंद्र का खरेदी करत नाहीय? लसींची खरेदी आपण राज्यांवर सोडू शकत नाही. आपला देश कोरोनाविरोधात युद्ध लढत आहे. जर पाकिस्तानने हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का? उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे? असा सवाल केजरीवालांनी मोदी सरकारला केला आहे.
Why isn’t this country buying vaccines? We can’t leave it on states. Our country is at war against Covid19. If Pakistan attacks India, will we leave states on their own? Will UP buy its own tanks or Delhi its own arms?: Delhi CM Arvind Kejriwal
— ANI (@ANI) May 26, 2021
माझ्या माहितीप्रमाणे देशातील कोणतेच राज्य लसीचा एक डोसदेखील खरेदी करू शकलेले नाहीय. लसी बनविणाऱ्या कंपन्यांनी राज्यांसोबत बोलण्यासही नकार दिला आहे. ही वेळ केंद्र आणि राज्य सराकरांनी एकत्र येऊन लढण्याची आहे. वेगवेगळे काम करू शकत नाही. आपल्याला टीम इंडियासारखे काम करावे लागणार आहे. लोकांना लसी पुरविणे ही केंद्राची जबाबदारी आहे, राज्यांची नाही. जर आणखी उशिर झाला तर माहित नाही आणखी किती जीव गमवावे लागतील, असा इशारा देखील केजरीवालांनी दिला आहे.