सगळे नियम धाब्यावर; तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी टोचून घेतली कोरोना लस!
By मोरेश्वर येरम | Published: January 16, 2021 05:09 PM2021-01-16T17:09:32+5:302021-01-16T17:12:34+5:30
पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील भाटार विधानसभा मतदार संघाच्या तृणमूलच्या आमदाराने नियम मोडून स्वत:ला लस टोचून घेतली.
कोलकाता
भारताने जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहीमेला आज सुरुवात केली आहे. सर्वप्रथम देशातील डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी नियम धाब्यावर बसवले आहेत.
पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील भाटार विधानसभा मतदार संघाच्या तृणमूलच्या आमदाराने नियम मोडून स्वत:ला लस टोचून घेतली. तृणमूलच्या आमदाराने लसीकरण मोहीमेचे सर्व नियम मोडून रुग्णालयात जाऊन लस टोचून घेतली.
पश्चिम बंगालमधील फक्त हे एकच उदाहरण नाही. तर कटवा विधानसभा मतदार संघातील आमदार रबी चटर्जी यांनीही कोरोना लस टोचून घेतली आहे.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टरांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश असून एकूण ३००६ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.
केंद्राने जारी केलेल्या नियमानुसार पहिल्या टप्प्यात देशातील एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि कोविड काळात पहिल्या फळीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या दोन कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील वय असलेल्यांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहेत. अशात राजकीय नेते, आमदार किंवा खासदारांना पहिल्या टप्प्यात स्थान देण्यात आलेलं नाही. असं असतानाही पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या दोन आमदारांनी लस टोचून घेतल्यानं वाद निर्माण झाला आहे.