Corona Virus: विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:43 AM2021-06-11T05:43:32+5:302021-06-11T05:43:58+5:30
Corona Virus: सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूवरील लस घेतली का, असा प्रश्न संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विचारला, तर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कोरोना महामारीविरोधातील लढाईत विरोधी पक्षांचे धोरण हे काेलांटउड्या मारणारे आहे, असा आरोप केला. ते म्हणाले, लसीकरण मोहिमेत होईल तेवढे अडथळे ते निर्माण करीत आहेत.
सोनिया गांधी, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करून रविशंकर प्रसाद यांनी आरोप केला की, “विरोधी पक्ष महिनाभरात आपली भूमिका बदलत आहेत. लसीकरण मोहिमेला खीळ घालण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधी पक्ष राजकारण करीत आहेत हे यातून दिसते.” १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचे ठरवले तेव्हा आरोग्य हा विषय राज्य सरकारांचा असल्याचा आणि राज्यांना लस प्राप्त करून घेऊन त्या वितरित करण्याची मुभा दिली जायला हवी असा विशिष्ट राग आळवला गेला.
विरोधकांनी मग भूमिकाच बदलली
प्रसाद यांनी म्हटले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी असे सुचविले होते की, भारताची रचना ही संघराज्याची असून, आरोग्य हा राज्यांचा विषय आहे, त्यामुळे केंद्र सरकार त्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.
१२ मे रोजी सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसी या केंद्र सरकारने प्राप्त केल्या पाहिजेत, असे पत्र लिहिले होते.
प्रल्हाद जोशी म्हणाले...
प्रल्हाद जोशी म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लस घेतलेली नाही. त्यांचा भारतीय लसीवर विश्वास नाही. आम्ही गेल्या जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात केली तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. आता मात्र ते लस घेत आहेत.”