Coronavirus :"राज्य सरकारच्या चुकांमुळे वाढला कोरोनाचा संसर्ग’’ भाजपा नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 01:37 PM2021-02-19T13:37:31+5:302021-02-19T13:38:29+5:30
corona outbreak In Maharashtra : राज्यात कोरोनाची राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ चिंताजनक बनली आहे. गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली.
जळगाव - राज्य शासनाने केलेल्या चुकांमुळे राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढला आहे. शासनाने योग्य वेळी आवर घातला असता, काही निर्बंध घातले असते तर बरे झाले असते, असा आरोप भाजप नेते व माजीमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांनी राज्य शासनावर केला आहे. गिरीश महाजन आज सकाळी जळगावातील शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आलेले होते. अभिवादन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (BJP leader Girish Mahajan targets Thackeray government over corona outbreak)
दरम्यान, राज्यात कोरोनाची राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ चिंताजनक बनली आहे. गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार असे दोन दिवस संचारबंदी लागू केली जाणार आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जमावबंदी असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विदर्भातील रुग्णसंख्येत अचानक २० टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शेकडो विवाह झाले, त्यामुळे या भागात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, असा प्राथमिक अंदाज आहे. अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा ३२ टक्के असून, अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ४८ टक्के आहे, तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर १५ टक्के आहे. संपूर्ण राज्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा ८.८ टक्के एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.४८ टक्के एवढा आहे.
मागील सात दिवसात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी नागपूर व वर्धा जिल्ह्यांत रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. नागपूर जिल्ह्यात ३,७८०, तर वर्धा जिल्ह्यात ५०३ रुग्णांची नोंद झाली. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांत रुग्ण वाढत आहेत.