CoronaVirus Live Updates : "कोरोनासंदर्भात भाजपा सरकार वारंवार खोटे आकडे सादर करतंय"; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:22 AM2021-05-11T08:22:36+5:302021-05-11T08:34:30+5:30

CoronaVirus Live Updates Akhilesh Yadav Slams BJP : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

CoronaVirus Live Updates Akhilesh Yadav Slams BJP And Modi Government Over Corona virus | CoronaVirus Live Updates : "कोरोनासंदर्भात भाजपा सरकार वारंवार खोटे आकडे सादर करतंय"; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप 

CoronaVirus Live Updates : "कोरोनासंदर्भात भाजपा सरकार वारंवार खोटे आकडे सादर करतंय"; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप 

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज कोरोनाचे तब्बल 3 लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुळे (CoronaVirus) दोन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींच्या वर गेली आहे. याच वेळी दुसरीकडे अनेक ठिकाणी कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि रुग्णालयात बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. अनेकांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार टीका केली आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत निशाणा साधला आहे. "कोरोनासंदर्भात भाजपा सरकार वारंवार खोटे आकडे सादर करत आहे. भाजपाला काय वाटतं की जनतेला आपल्या डोळ्यांसमोर होणाऱ्या मृत्यूचं सत्य दिसत नाही का? भाजपाच्या या खोटेपणाला कंटाळलेल्या समाजाने आँकडा ऐवजी आँखडा हा शब्द वापरायला हवा. कारण डोळ्याने जे पाहिलेलं असतं तेच खरं असतं" असं म्हणत अखिलेश यांनी टीकास्त्र सोडलं आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांच्या संख्येत आणि नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 

"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील ओवैसी यांनी केली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पंतप्रधान संसद आणि पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात. मात्र ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी" असं ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका?; 20 दिवसांत तब्बल 26 प्राध्यापकांचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. रुग्णांची आणि मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान एक धक्कादाक माहिती समोर आली आहे. 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे असलेल्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये गेल्या 20 दिवसांमध्ये 26 प्राध्यापकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने प्राध्यापकांचा मृत्यू झाल्याने विद्यापीठात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मनसुर यांच्या भावाचाही गेल्या आठवड्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तारीक यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआरला) लिहिलेल्या पत्रामध्ये विद्यापीठातील कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या चाचण्या करुन येथील व्यक्तींना संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास करुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल संशोधन करावं अशी मागणी केली आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates Akhilesh Yadav Slams BJP And Modi Government Over Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.