CoronaVirus Live Updates : "हा भाजपाचा न्यू इंडिया, जिवंतपणी उपचार नाहीत अन् मृत्यूनंतर मृतदेह बेवारस म्हणून फेकतात नदीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:56 PM2021-05-13T14:56:09+5:302021-05-13T15:31:47+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यसभेचे खासदार आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

CoronaVirus Live Updates Sanjay Singh says Yogi Government throwing covid body in river | CoronaVirus Live Updates : "हा भाजपाचा न्यू इंडिया, जिवंतपणी उपचार नाहीत अन् मृत्यूनंतर मृतदेह बेवारस म्हणून फेकतात नदीत"

CoronaVirus Live Updates : "हा भाजपाचा न्यू इंडिया, जिवंतपणी उपचार नाहीत अन् मृत्यूनंतर मृतदेह बेवारस म्हणून फेकतात नदीत"

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत असतानाच राज्यामध्ये कोरोना मृतांची आकडेवारी सरकारकडून लपवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी गाजीपूर जिल्ह्यामध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने मृतदेह आढळून आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना मृतांच्या आकडेवारीसंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. याच दरम्यान राज्यसभेचे खासदार आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह (Sanjay Singh) यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

संजय सिंह यांनी "हा भाजपाचा न्यू इंडिया आहे, जिथे जिवंत असताना उपचार मिळत नाहीत आणि मृत्यू झाल्यानंतर नदीमध्ये बेवारस म्हणून मृतदेह फेकून दिले जातात" अशा शब्दांमध्ये टीका केली आहे. कोरोना मृतांचा आकडा लपवण्यासाठी योगी सरकार नदीमध्ये मृतदेह फेकून देत असल्याचा आरोप देखील केला आहे. या सरकारच्या कार्यकाळामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर पारंपारिक पद्धतीने योग्य प्रकारे अंत्यसंस्कार केले जात नाहीत. कानपुरमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर हजारहून अधिक जणांचे मृतदेह पुरण्यात आल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. अशापद्धतीने अंत्यसंस्कार केल्याने गंगा नदीच्या किनाऱ्यावरील परिस्थिती भयानक झाली असल्याचं म्हटलं आहे. 

"कानपूर, उन्नाव, गाजीपूरमध्ये नदीतून वाहत आलेल्या मृतदेहांवरुन हे सांगता येतंय की योगी सरकार कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांवर अंत्यसंस्कार करत नाही. त्यांचे मृतदेह बेवारस म्हणून नदी, नाल्यांमध्ये फेकून दिलं जात आहेत" असं म्हटलं आहे. संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार जनतेला चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशमधील सरकार कोरोना साथीच्या कालावधीमध्ये सामान्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्यासमोर खोटी आकडेवारी ठेऊन त्यांची फसवणूक करण्याचं काम करत आहे, अशी टीका सिंह यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पाच हजारांची मदत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र समोर आलेल्या घटनांमधून योगी सरकार केवळ कागदावर काम करत असून प्रत्यक्षात काहीच घडत नसल्याचा टोलाही सिंह यांनी लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान आता उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये या डॉक्टरांनी अपर मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. 

"आम्हाला कामचोर, मूर्ख म्हणतात, टोमणे मारतात"; CMO वर गंभीर आरोप करत डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा

डॉक्टरांच्या असोसिएशनचे सचिव डॉ. संजीव कुमार यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. येथील अधिकारी आम्हाला कामचोर आणि मूर्ख म्हणतात असं संजीव कुमार म्हणाले आहेत. तुम्ही लोक काम करत नाही. सतत लखनऊ आणि कानपूरला पळून जाता, असे टोमणेही आम्हाला सरकारी अधिकारी मारत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांकडूनच आम्हाला सहकार्य मिळत नाही. त्यांना ग्रामीण भागांमध्ये लसीकरण करण्यात अजिबात रस नाही. मात्र ते आमच्यावर टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत असतात असं देखील म्हटलं आहे. मोठ्याप्रमाणात डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने कोरोना लसीकरणावर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates Sanjay Singh says Yogi Government throwing covid body in river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.