coronavirus: "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यातून कोरोना जाणार नाही, ते कोरोनाला जाऊ देणार नाहीत, कारण..."
By बाळकृष्ण परब | Published: February 22, 2021 03:33 PM2021-02-22T15:33:40+5:302021-02-22T15:38:47+5:30
Coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील वाढत्या कोरोनावरून आता राजकारणालाही जोर आला आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. (Coronavirus in Maharashtra ) त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल राज्यातील जनतेला संबोधित करताना दैनंदिन व्यवहारांवर काही निर्बंध आणण्याची घोषणा केली आहे. तसेच कोरोना वाढल्यास लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोनावरून आता राजकारणालाही जोर आला आहे. (BJP Leader Nilesh Rane Criticize CM Uddhav Thackeray) भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनीही कोरोनावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (As long as Uddhav Thackeray is the Chief Minister, Corona will not leave the Maharashtra)
निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, जगामध्ये उद्धव ठाकरेंसारखा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि ते कोरोना जाऊ देणार नाहीत. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्यांनाच घरीच बसायला आवडतं, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
अजून एका ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही. मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? लॉकडाऊनच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या, बँकेचे हफ्ते, लाईटबील घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन होतेय.
१४००० ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? Lockdownच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या, बँकेचे हफ्ते, लाईटबील घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत Lockdown.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 22, 2021
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे सहा हजार ९७१ नवे रुग्ण सापडले होते. तर कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात केवळ २ हजार १४७ रुग्ण बरे झाल्याने कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये ४५१९ रुग्णांची भर पडली होती.