Coronavirus: मानलं दादा! अहोरात्र रुग्णसेवेसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा कोविड सेंटरमध्येच मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:11 PM2021-05-05T16:11:40+5:302021-05-05T16:13:40+5:30
बाधित रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं काम निलेश लंके यांच्या माध्यमातून होत आहे.
पारनेर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या परिनं मतदारसंघात कोविड सेंटर, ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल किंवा मदत केंद्र उभारून रुग्णांना सहकार्य करत आहेत. यात पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी इथेच मुक्काम करत आहेत.
बाधित रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं काम निलेश लंके यांच्या माध्यमातून होत आहे. लंके यांनी गेल्यावर्षी कर्जुले हर्या येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर उभारून साडे चार हजार कोरोना बाधित रुग्णांना मदतीचा हात दिला होता. त्यानंतर यंदाच्या कोरोना लाटेतही निलेश लंके यांनी भाळवणी येथे अकराशे बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारले आहे. कोरोना संकटकाळात काही पुढारी घरात बसून आहेत तर काहीजण रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत आहेत. त्यापैकी एक निलेश लंके आहेत.
निलेश लंके कोविड सेंटरच्या माध्यमातून जनसेवा करत असून याचठिकाणी त्यांचे जेवण होते आणि मुक्कामदेखील करतात. रात्री बेरात्री एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागली किंवा अन्य औषधांची गरज भासली तर ते इथेच उपलब्ध राहून तात्काळ रुग्णाला मदत करतात. सध्या त्यांना एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात ते कोविड सेंटरमध्येच जमिनीवर झोपलेल्याचं दिसून येत आहे. आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात.
या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, शिरा, पोहे तर दुपारच्या जेवणामध्ये मांसाहार, पालेभाज्या तसेच यांच्यासह फळे ते पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी देण्यात येतं. जिल्हाभरातून हजारो रुग्ण सेंटरमध्ये दाखल झाले असून दररोज शंभराच्यावर पेशंट बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे शरदचंद्र पवार महाकोविड सेंटर गोरगरीब रुग्णासाठी आधार केंद्र आहे.
माझं काय व्हायचं ते होऊ द्या...
"आपलं काय व्हायचं ते होऊ द्या. जर मी घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. माझी लोकं सुरक्षित असली पाहिजेत,"असं म्हणत लंके हे दिवसरात्र कोरोनाबाधितांच्या सेवेत झटत आहेत. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असून तो त्यांचा कुटुंबप्रमुखही असतो, अशी भावना लंके यांनी व्यक्त केली होती.