काँग्रेसचा बडा नेता म्हणतो, "नरेंद्र मोदींना सोयरसुतक नाही; नितीन गडकरी पंतप्रधान हवेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 12:36 PM2021-05-19T12:36:27+5:302021-05-19T12:37:13+5:30
नितीन गडकरींच्या रुपात मराठी माणूस पंतप्रधान होतोय तर आनंदच; काँग्रेस नेत्याची बॅटिंग
मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे सोपवायला हवं, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केली होती. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीदेखील त्यांच्या सूरात सूर मिसळला आहे. कोरोनामुळे देशात अनेकांचा जीव गेला. मात्र पंतप्रधान मोदींना त्याचं सोयरसुतक नाही. नितीन गडकरींनी पंतप्रधान असायला हवं होतं, असं नाना पटोले म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Nitin Gadkari Should be PM instead of Narendra Modi says Congress Leader Nana Patole)
कोरोना लसीच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी दहा कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला दिला. त्यावरुन नाना पटोले यांनी टोला लगावला. 'मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही. पण आम्हाला वाटतं की नितीन गडकरी हे पंतप्रधान असायला हवे होते. कोटी लोक देशात मरत आहेत. मात्र मोदींना त्याचं सोयरसुतक नाही,' अशी टीका पटोलेंनी केली.
देशातील लसटंचाई दूर करण्यासाठी नितीन गडकरींचा PM मोदींना 'दस नंबरी' मंत्र
मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे. मी नितीन गडकरी यांच्याविरोधात लढलो, त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती. त्यामुळे मला आनंद वाटतो, असं नाना पटोले म्हणाले.
आता शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजली
केंद्र सरकारनं दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष केलं. उलट कोरोना संपला असं सांगण्यात आलं. त्याचे परिणाम काय झाले हे आपण सगळ्यांनी पाहिलं, अशी टीका पटोलेंनी केली. कोरोना महामारीत लोकांचा जीव गेला. शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी देशोधडीला लागला. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट देऊ असं मोदी म्हणाले होते. पण आता शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजली आहे, असं नाना पटोले म्हणाले.