Coronavirus: “संकटाच्या काळात बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, एकजुटीनं कोरोनावर मात करूया”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 01:07 PM2021-04-08T13:07:09+5:302021-04-08T13:08:55+5:30
Sharad pawar Facebook live on Coronavirus:. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोरपणाची पावले टाकायची आवश्यकता आहे. राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय त्याचप्रमाणे केंद्र सुध्दा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे
मुंबई - कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने, सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे, आता त्याला पर्याय राहिलेला नाही. आपल्या सगळ्यांना व प्रसारमाध्यमांना, राजकीय नेत्यांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या घटकांना विनंती आहे की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, विचार करुन या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यसरकारचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळाले पाहिजे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस व सगळे घटक अशा संकटाच्या काळात बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण एकजुटीने सामोरं जाण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करेल याबाबत शंका नाही. या सगळ्या सामुहिक प्रयत्नातून आपण कोरोनावर निश्चित मात करु व नागरिकांची कोरोनातून सुटका करु असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जिवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्यसरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे असं पवार म्हणाले. फेसबुकद्वारे त्यांनी राज्यातील जनतेसोबत संवाद साधला.
तसेच शरद पवार यांनी गेल्यावर्षी आणि यावर्षीची कोरोनाची सद्यस्थितीतील आकडेवारी राज्यातील जनतेसमोर मांडली. एवढी गंभीर व भयावह स्थिती यापूर्वी देशातील कुठल्याही राज्यात अशी कधी नव्हती. सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय ही चिंताजनक बाब आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे सगळे घटक त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे अहोरात्र कष्ट करत आहेत. अहोरात्र कष्ट करुन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. रुग्णांसाठी बेड्स, वैद्यकीय उपकरणं आणि इतर पायाभूत सुविधा यांचादेखील प्रचंड ताण आलेला आहे. त्यामुळे नाईलाजाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्यसरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. आता पर्याय राहिलेला नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.
त्याचसोबत केंद्र सरकारचा सुध्दा यासाठी आग्रह आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोरपणाची पावले टाकायची आवश्यकता आहे. राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय त्याचप्रमाणे केंद्र सुध्दा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे असे सांगतानाच कालच देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या कमतरता आहे याबाबत चर्चा केली. त्यांनी या सर्व संकटात केंद्रसरकार व आरोग्य खातं पूर्ण शक्तीने सर्व राज्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील सरकारच्याही पाठिशी आहे. त्यामुळे त्यांची मदत व आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्न यातून मार्ग काढायचा आहे. बंधने आणली की साहजिकच अस्वस्थता येते. शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकांना या संकटामुळे फार मोठी झळ बसली आहे. व्यवसाय, दुकाने बंद झाल्याने व्यापारी वर्गाचं नुकसान झाले आहे. फळभाज्यासारख्या नाशवंत शेतीमाल तयार करणार्या शेतकऱ्याला आपल्या मालाचं करायचं काय? विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर्गाचे देखील अपरिमित नुकसान होत आहे. या सगळ्यातून पुढे जात आहोत परंतु पुढे जात असताना यातून यशाचा मार्ग काढायचा असेल, यश सिध्दीला न्यायचं असेल तर या सगळ्या स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे असंही शरद पवार म्हणाले.