coronavirus: "महाराष्ट्राप्रमाणे देशातही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 03:06 PM2021-04-13T15:06:59+5:302021-04-13T15:07:45+5:30
Sanjay Raut News : एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रातच नाही तर देशामध्येही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रासह देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे शासन आणि प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. (coronavirus in Maharashtra ) त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लावण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रातच नाही तर देशामध्येही लॉकडाऊन लागल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. (Sanjay Raut Says "Don't be surprised if the country starts lockdown like Maharashtra")
राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनबाबत मत मांडताना राऊत यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, अस्लम शेख कॅबिनेट मंत्री आहेत. मुंबईचे पालकमंत्री आहेत. बैठकीमध्ये ते असतात. सरकारच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री बोलू शकतात किंवा पालकमंत्री बोलू शकतात. मात्र मला जे चित्र दिसतंय त्यानुसार महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातच लॉकजाऊन लावले गेले तर आश्चर्य वाटायला नको. काल उत्तर प्रदेशमध्ये हरिद्वारलासुद्धा लाखो लोक एकत्र आले. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांच्या सभा होत आहेत. त्यामनाने महाराष्ट्रात या गोष्टींवर नियंत्रण आहे, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये बाहेरील राज्यांमधून लोक येतात. तिथे काहीच नियंत्रण नाही आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या कारवाईचाही निषेध केला आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली आहे. केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा लोकशाही आणि भारताच्या स्वतंत्र संस्थांच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला आहे, अशी टीका करत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे.