Coronavirus: “उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; कोरोनाकाळात देवही वाचवायला येणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:52 PM2021-05-12T15:52:19+5:302021-05-12T15:54:39+5:30
यात एका वारकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केल्यानंतर त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत त्यांनी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे.
बुलडाणा – शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत “उपास-तपासाची वेळ नाही, कोरोना काळात देवही वाचवायला येणार नाही’ असं छापून आलं आहे. यानंतर वारकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे. याबद्दल अनेकांनी संजय गायकवाड यांना फोन करून निषेध व्यक्त केला आहे.
यात एका वारकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केल्यानंतर त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत त्यांनी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. हे बेताल वक्तव्य करून आतापर्यंत सनातन हिंदू समाजाने शाकाहार सोडून मांसाहारकडे वळावं असं दिसतं. संजय गायकवाड यांनी माफी मागतली पाहिजे अन्यथा राज्यातील सर्व वारकरी मंडळी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.
काय आहे ऑडिओ क्लीपमध्ये?
तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज २०-२५ जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहित्येय, पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होतं? असंही संजय गायकवाड बोलत असल्याचं ऐकायला मिळत आहे.
मुलाखतीत काय म्हटलं होतं?
कोरोनाकाळात मंदिरंही बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज ४ अंडे खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त भरपूर खा असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर चर्चेत
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Shiv sena MLA Sanjay Gaikwad) यांनी ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, असे वादग्रस्त विधान केल्याने चांगलेच चर्चेत आले होते. यावरून शिवसेना-भाजपा यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.