देशाचा मूड भाजपाबरोबर नाही, रालोआ थांबेल २३३ जागांवरच : सर्वेक्षणाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 06:13 AM2019-01-25T06:13:00+5:302019-01-25T06:13:34+5:30
आज निवडणूक झाल्यास केंद्रातील सत्तेच्या किल्ल्या कोणाच्या हाती जातील यावर एबीपी-सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारी चकित करणारी आहे.
नवी दिल्ली : आज निवडणूक झाल्यास केंद्रातील सत्तेच्या किल्ल्या कोणाच्या हाती जातील यावर एबीपी-सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारी चकित करणारी आहे. देशाचा मूड भाजपसोबत नाही. फिकट झालेल्या मोदी मॅजिकच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हाती ५४३ जागांपैकी २३३ जागा येतील, असे दिसत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सर्व्हे घेतला आहे. प्रियंका गांधी-वाड्रा सक्रीय राजकारणात येण्याआधी व पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी स्वीकारण्याआधी झालेल्या या सर्व्हेपेक्षा जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या सर्व्हेला अधिक महत्व आहे.
>महाराष्ट्रात जोरदार लढत
४८ जागांच्या महाराष्टÑात रालोआची २०१४ ची जादू चालणार नाही. येथे त्याला फक्त १६ जागा मिळतील. तर युपीएला २८ तर शिवसेनेला फक्त ४ जागा मिळतील. येथे भाजप युतीला जवळपास २५ जागांचा फटका बसेल.
>मध्य प्रदेश-राजस्थानात परिणाम होणार नाही : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मध्य प्रदेश आणि राजस्थान गमावले. परंतु, लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम होणार नाही. मध्य प्रदेशातील २९ जागांपैकी रालोआच्या हाती २३ व काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानावे लागेल. राजस्थानमधील २५ जागांपैकी रालोआला १८ व युपीएला ७ जागा मिळताना दिसतात.
>छत्तीसगड तर गेले : छत्तीसगड विधानसभा निवडणूक भाजपने गमावली व लोकसभा निवडणुकीत त्याच्या हाती काही लागणार नाही. येथील ११ जागांपैकी फक्त ५ जागा त्याला व काँग्रेसला ६ जागा मिळतील.
बुआ-बबुआची धमाल : उत्तर प्रदेशात सपा-बसपा युती रंग दाखवून २०१४ तील मोदी मॅजिकला फिके करील. ८० जागांपैकी रालोआच्या हातीफक्त २५ येतील तर अखिलेश-मायावती ५१ जागा जिंकतील, तर युपीएला ४ जागा मिळतील.
>ममतांची जादू कायम
भाजपने अनेक प्रयत्न करूनही पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांचा दबदबा कायम आहे. राज्यातील ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसला ३४ जागा मिळताना दिसत आहेत तर भाजपच्या खात्यात ७ व युपीएला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागेल. १४३ जागा समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, तेलगू देसम पक्ष यासारख्या प्रादेशिक पक्षांना मिळतील.