डान्सबार खुलेआम सुरू, ही सरकारसाठी लाज आणणारी बाब - प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 08:41 PM2021-07-20T20:41:34+5:302021-07-20T20:46:35+5:30
Pravin Darekar : राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
मुंबई : ठाण्यातील आम्रपाली, नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन प्रसार माध्यमांनी प्रसारीत केले. यावरून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू आहेत. ही सरकारसाठी लाज आणणारी बाब आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधने आली आहेत. असे असताना दुसरीकडे डान्सबारवर बंदी असतानाही ते राजरोसपणे सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली असली तरी तात्पुरती आणि तुटपुंजी कारवाई केली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
अशा प्रकारची एखादी घटना घडली की, मोठ्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी छोट्या अधिकाऱ्यांचा बळी दिला जातो. त्यामुळे डान्सबार चालू केल्याप्रकरणी ज्याचा-ज्याचा संबध आहे, त्यावर कारवाई झालीच पाहिजे. पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी कारवाई केली पाहिजे. तसेच, कारवाई केली तर जे असे कृत्य करतात, त्यांना कायमची चपराक बसेल आणि त्यांना पुढे असे कृत्य करताना विचार करावा लागेल. त्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
याचबरोबर, सरकार कोरोनाची भिती दाखवत सर्वसामान्यांवर निर्बंध घालत आहेत. सामान्यांना गर्दी करू नका, असे ओरडून सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला डान्स बार चालू ठेवून गर्दी करत धिंगाणा घालायचा. अशा प्रकारे धिंगाणा घालण्याकरता परवानगी दिली जाते, ही दुर्दैवाची बाब आहे. यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुद्धा प्रवीण दरेकर यांनी केली.
दरम्यान, ठाणे शहर परिसरातील नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत आम्रपाली आणि अँटीक पॅलेस या दोन डान्सबारसह वर्तकनगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणारा नटराज डान्सबार निर्बंध असतानाही बिनदिक्कतपणे सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या डान्सबारमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली सुरू असल्याचे व्हिडीओत दिसून आले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली.
या प्रकरणी गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशीच्या आधारावर नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यावर काल निलंबनाची कारवाई केली. तसेच, याप्रकरणी नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. तर आम्रपाली, अँटीक पॅलेस आणि नटराज या तिन्ही बारचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.