जनाब देवेंद्र फडणवीस; रोझा-इफ्तारचं 'ते' पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

By कुणाल गवाणकर | Published: January 2, 2021 12:58 PM2021-01-02T12:58:21+5:302021-01-02T13:01:20+5:30

अडीच वर्षांपूर्वीचं दावत-रोझा-इफ्तारचं पोस्टर व्हायरल

dawat roza iftar poster which includes then cm devendra fadnavis name goes viral | जनाब देवेंद्र फडणवीस; रोझा-इफ्तारचं 'ते' पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

जनाब देवेंद्र फडणवीस; रोझा-इफ्तारचं 'ते' पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext

मुंबई: शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वरून भाजपानं शिवसेनेवर टीका केली असताना आता सोशल मीडियावर दावत-रोझा-इफ्तारचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. याशिवाय पोस्टरवर भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांची नावं आहेत. त्यांच्या नावांपुढेही जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे. ट्विटर, फेसबुकवर या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला आहे.



सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दावत-रोझा-इफ्तारचं आयोजन अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये इफ्तारची तारीख (७ जून २०१८) देण्यात आली आहे. मुंबईतील सीएसटी येथील पलटन रोड परिसरातील हज हाऊसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. त्यांच्या नावाचा उल्लेख पोस्टरवर असून त्यापुढे जनाब लिहिण्यात आलं आहे.



देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर पाहुणे म्हणून भाजप नेते शाहनवाझ हुसेन, तत्कालीन मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या यांचा उल्लेख आहे. पोस्टरवरील मजकुरासाठी हिरवा रंग वापरण्यात आला आहे. भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश असलेले इफ्तारचं हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.



शिवसेनेच्या कॅलेंडरवर भाजपची जोरदार टीका
शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वर भाजपानं जोरदार टीका केली आहे. भगव्या आणि हिरव्या रंगात उर्दू मजकूरासह शिवसेनेनं शिवशाही हे कॅलेंडर छापलं असून त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवशाही कॅलेंडरचा फोटो ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 



भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवशाही कॅलेंडरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी यासोबत "शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही...," असं म्हणत खोचक टोला लगावला. "शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही," असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

Web Title: dawat roza iftar poster which includes then cm devendra fadnavis name goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.