DDC Election : काश्मीरमध्ये पहिल्यांदा भाजपचं 'कमळ' उमललं; तीन जागांवर विजय
By मोरेश्वर येरम | Published: December 22, 2020 06:22 PM2020-12-22T18:22:44+5:302020-12-22T18:29:43+5:30
भाजपने स्थानिक बलाढ्य पक्षांना धूळ चारत काश्मीरमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे.
काश्मीर
एकवेळ अशी होती की काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचं (भाजप) अस्तित्वच नव्हतं. आज त्याच काश्मीर खोऱ्यात भाजप 'कमळ' उमललं आहे. भाजपने जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत (डीडीसी) नॅशनल कॉन्फरंस आणि पीडीपीसारख्या स्थानिक बलाढ्य पक्षांना धूळ चारत काश्मीरमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे.
भाजपच्या ऐजाज हुसैन यांनी श्रीनगरच्या खोंमोह-२ (Khonmoh-II) जागेवर आणि ऐजाज अहमद खान यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील तुलैल येथे विजय प्राप्त केला आहे. दुसरीकडे पुलवामा जिल्ह्यात काकपोरा जागेवरही भाजपच्या मुन्ना लतीफ यांचा विजय झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील विजय भाजपसाठी अत्यंत मोठा विजय मानला जात आहे.
ऐजाज हुसैन यांनी आपल्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज काश्मीरमध्ये कमळ उमललं आहे. या निवडणुकीत भाजप एका बाजूला तर दुसरीकडे इतर सर्वपक्ष होते. लोकांनी पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला. आजचा निकाल इतर पक्षांना एक जोरदार संदेश देणारा निकाल आहे", असं ऐजाज हुसैन म्हणाले.
"देशाच्या विरोधात काम करणाऱ्या गुपकर आघाडीच्या विरोधात भाजपने जोरदार लढत दिली आहे. निवडणुकीचे निकाल काय लागतील याची आधीच कल्पना असल्यानं गुपकर आघाडीतील पक्ष घाबरुन एकत्र आलेत. त्यांच्या विरोधानंतरही भाजपने विजय प्राप्त केला आहे", असंही हुसैन म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेसाठी २८० जागांसाठी एकूण ८ टप्प्यांमध्ये मतदान झालं आहे. या निवडणुकीत एकूण २१७८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. महत्वाची बाब म्हणजे कलम ३७०, ३५-अ रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. यंदाची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. संपूर्ण शक्ती पणाला लावून भाजपने या निवडणुकीत प्रचार केला होता. त्याचं फळ देखील भाजपला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. २८० जागांपैकी २३१ जागांचे निकाल हाती आले आहेत. यात ५४ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर गुपकर आघाडीचे उमेदवार ९५ जागांवर आघाडीवर आहेत.