तरुण खासदारांचा घसरता टक्का, सरासरी वयोमान ४६ वर्षे २०१४ मध्ये ५५.४ वर्षे
By प्रेमदास राठोड | Published: April 18, 2019 05:14 AM2019-04-18T05:14:27+5:302019-04-18T05:15:08+5:30
सर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत.
- प्रेमदास राठोड
सर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पंचविशीतील १३४ उमेदवारांपैकी एकही लोकसभेत जाण्यात यशस्वी झालेला नाही. देशाच्या लोकसंख्येत तरुणांचा टक्का वेगाने वाढत असला तरी लोकसभेची वाटचाल मात्र वृद्धत्वाकडे आहे. पहिल्या लोकसभेत सदस्यांचे सरासरी वयोमान ४६ वर्षे होते. ते आता सरासरी ५५.४ वर्षांवर नेऊन विद्यमान सोळाव्या लोकसभेने पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. मध्यंतरी एकदा (१९८०) सातव्या लोकसभेत वयोमान ४९.९ वर्षांपर्यंत खाली आले होते, त्यानंतर मात्र ते सातत्याने वाढत गेले. आताही सर्व मोठे पक्ष साठी पार केलेल्यांना हिरीरीने उमेदवारी देत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पंचविशीतील १३४ उमेदवारांपैकी एकही लोकसभेत जाण्यात यशस्वी झालेला नाही.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पन्नाशीपर्यंतचे ५,३२५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २२५ जण लोकसभेत पोहोचले. नंतरच्या सोळाव्या लोकसभेत मात्र ही संख्या २०२ पर्यंत खाली घसरली. याउलट पन्नाशीनंतरच्या उमेदवारांचा टक्का मात्र वाढला. २००९ मध्ये ५१ वर्षांवरील २,७४५ उमेदवार रिंगणात होते, त्यातील ३१८ लोकसभेत पोहोचले. गेल्या निवडणुकीत (२०१४) तर ही संख्या चक्क ३४२ पर्यंत वाढली. २००९ मधील ३० वर्षीय खासदारांची संख्या २ होती, २०१४ मध्ये ही शून्य झाली. ३५ वर्षांचे ८ उमेदवार २००९ मध्ये विजयी झाले होते, २००४ मध्ये ही संख्या ४ पर्यंत घसरली. ३६ वर्षीय खासदारांची संख्या २००९ मध्ये १४ होती, ती २०१४ मध्ये ७ झाली. २०१४ मध्ये ४० वर्षीय २४६ उमेदवारांपैकी फक्त ५ लोकसभेवर गेले, २००९ मध्ये ११ जण निवडले गेले होते. ३६ ते ५० वयोगटातील १९४ उमेदवार २००९ मध्ये विजयी झाले होते, ही संख्या २०१४ मध्ये १६८ पर्यंत खाली घसरली. याउलट ६१ ते ७५ वयोगटातील २००९ मधील खासदारांची १२२ ही संख्या २०१४ मध्ये वाढून चक्क १४८ झाली. लोकसभेतील तरुणांचे हे घटते प्रमाण चिंताजनक आहे.
महाराष्ट्रातून लोकसभेवर गेलेल्या सदस्यांचे सरासरी वयोमान देखील फार आशादायक नाही. २००९ आणि २०१४ दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातून २६ ते ३५ या वयोगटातील ४-४ उमेदवारांनी बाजी मारली. ३६ ते ५० वयोगटातील विजयी उमेदवारांची संख्या २०१४ मध्ये एकने वाढून १५ झाली, २००९ मध्ये ही संख्या १४ होती. २००९ मध्ये ५१ ते ६० वयोगटातील १७ जण विजयी झाले होते, नंतर २०१४ मध्ये ही संख्या १६ झाली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने देशात २०१४ मध्ये २५ ते ३५ वयोगटातील फक्त १७ उमेदवार दिले होते. त्यातील ११ जण विजयी झाले. यात काँग्रेसचे २५ पैकी फक्त दोघेच यशस्वी ठरले. ३६-५० वयोगटातील भाजपाचे ९१ जण लोकसभेत केले. तर काँग्रेसचे या वयोगटातील फक्त १० उमेदवार यशस्वी ठरले. ५१-६० वयोगटातील भाजपाचे १०१ उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे फक्त दोघेच जिंकले. ६१-७५ वयोगटातील चक्क १४५ उमेदवार काँग्रेसने दिले, पण मतदारांनी फक्त १९ जणांना पास केले. भाजपाचे या वयोगटातील ११६ पैकी ७२ विजयी झाले.
काँग्रेसचे ७६ वर्षांवरील ९ पैकी ८ जणांना मतदारांनी नकारले. ६१ वर्षांवरील भाजपाच्या ७९ खासदारांमुळेच सोळाव्या लोकसभेतील सदस्यांच्या सरासरी वयोमानाने उच्चांक नोंदविली. शिवसेनेने ६० वर्षांच्या आतील १३ तर ६१ वर्षांवरील ५ जणांना गेल्यावेळी लोकसभेवर पाठविले. राष्ट्रवादीने ६० वर्षांच्या आतील २८ पैकी ४ जण आणि ६१ वर्षांवरील ८ पैकी दोघे लोकसभेवर गेले. या निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यातील १७ जागांवर प्रमुख पक्षांनी दिलेल्या उमेदवारांचे सरासरी वयोमान तरुणांचा टक्का कमी करणारा ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ११ उमेदवारांचे सरसारी वयोमान सर्वाधिक ५८ वर्षे आहे. भाजपाच्या १० उमेदवारांचे सरासरी वयोमान ५७, राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांचे वयोमान ५५ तर शिवेसनेच्या ७ उमेदवारांचे प्रमाण ५२ आहे.