'300 युनिट मोफत वीज, जुनी बिलेही माफ होतील', केजरीवालांचे उत्तराखंडमधील जनतेला आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 02:41 PM2021-07-11T14:41:48+5:302021-07-11T14:44:15+5:30
Arvind Kejriwal : उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व जुनी बिले माफ केली जातील आणि लोकांना 24 तास मोफत वीज देण्यात येईल. याशिवाय, शेतकऱ्यांनाही मोफत वीजदेखील देण्यात येईल, असे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (AAP ) आज आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा केली. उत्तराखंडमध्ये आपचे सरकार स्थापन झाल्यानंतर 300 युनिट वीज सर्वसामान्यांना मोफत देण्यात येईल, असे आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी जाहीर केले. तसेच, उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व जुनी बिले माफ केली जातील आणि लोकांना 24 तास मोफत वीज देण्यात येईल. याशिवाय, शेतकऱ्यांनाही मोफत वीजदेखील देण्यात येईल, असे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. (delhi cm arvind kejriwal announced to give 300 units of electricity free after formation of government in uttarakhand)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका ट्विटमध्ये उत्तराखंडमधील लोकांना मोफत वीज देण्याचे संकेत दिले होते. 'दिल्ली स्वतः वीजनिर्मिती करत नाही, इतर राज्यातून खरेदी करते, तरीही दिल्लीत वीज मोफत आहे. उत्तराखंडमधील लोकांना मोफत वीज का मिळू नये?,' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
देहरादून दौर्यापूर्वी पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण, राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडीं दरम्यान आम आदमी पार्टी ज्या पद्धतीने सक्रिय झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
डेहराडूनमध्ये जनतेला आश्वासन
आज डेहराडूनमध्ये अरविंद केजरीवाल दाखल झाले. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला वीजसंबंधित 4 आश्वासने दिले. 'सत्ताधारी पक्षाकडे मुख्यमंत्रीच नाही. त्यांचा पार्टी स्वतःच असे म्हणतात की, आमचा मुख्यमंत्री वाईट आहे, भाजपामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी लढा सुरू आहे. विरोधी पक्षाकडे नेता नाही, ते दिल्लीला फेऱ्या मारण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीतउत्तराखंडच्या विकासाबद्दल कोण विचार करेल?' असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, उत्तराखंडमधील बरेच लोक दिल्लीत राहतात आणि ते दिल्लीत विकास कसा होत आहे, हे सांगतात. आज मी विशेषतः विजेच्या क्षेत्रासंबंधी 4 आश्वासने देतो, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
पार्टीची 4 आश्वासने
1- दिल्लीमध्ये करुन दाखविल्यानुसार, उत्तराखंडमध्ये आमचे सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक कुटुंबाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल.
2- जुनी बिले माफ केली जातील.
3- कोणतीही वीज कपात होणार नाही, 24 तास वीज दिली जाईल.
4- शेतकर्यांना शेतीसाठी मोफत वीज दिली जाईल.
लवकरच मुख्यमंत्र्यांची घोषणा
जर सरकार स्थापन झाले तर उत्तराखंडमध्ये 5 वर्ष कोणत्याही गोष्टीवर कोणताही अतिरिक्त कर वाढविला जाणार नाही आणि जास्तीचे कर्ज घेतले जाणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांचा चेहरा उत्तराखंडचा असेल. मी लवकरच येईन आणि मुख्यमंत्र्यांचा नावाची घोषणा करेन.'