दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण प्रकरणातून केजरीवाल-सिसोदिया यांची निर्दोष सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 02:40 PM2021-08-11T14:40:39+5:302021-08-11T14:44:59+5:30
Delhi CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपच्या इतर नऊ आमदारांवर दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण केल्याचा आरोप होता.
नवी दिल्ली:दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह नऊ आमदारांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने बुधवारी या सर्वांची एका मारहाणीच्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नऊ आमदारांवर दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण केल्याचा आरोप होता. पण, आता हा आरोप सिद्ध न झाल्यामुळे दिल्लीतील विशेष न्यायालयाने या सर्वांची सुटका केली आहे. पण, आपचे आमदार अमानतुल्लाह खान आणि प्रकाश जरवाल यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने आरोपी ठरवले आहे.
'सत्याचा विजय'
न्यायालयाच्या या निकालनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत 'सत्याचा विजय झाला' असे म्हटले आहे. तर, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी, 'दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना मुख्य सचिवांना मारहाण केल्याच्या खोट्या आरोपातून मुक्त करण्यात आले. सत्यमेव जयते,'असे म्हटले.
सत्यमेव जयते https://t.co/JJuWdsslie
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 11, 2021
Delhi CM @arvindkejriwal ji discharged by Court in fabricated CS assault case.
— Manish Sisodia (@msisodia) August 11, 2021
I will do a press briefing at 12 on this issue.
सत्यमेव जयते
13 जणांवर आरोप
दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचीव अंशु प्रकास यांना मारहाण केल्याचा आरोप आपच्या नेत्यांवर होता. यात आपचे आमदार नितिन त्यागी, ऋतुराज गोविंद, संजीव झा, अजय दत्त, राजेश ऋषी, राजेश गुप्ता, मदन लाल, प्रवीण कुमार आणि दिनेश मोहनिया यांची नावे होती. सीएम केजरीवाल आणि डेप्युटी सीएम सिसोदिया यांना मिळून एकूण 13 जणांवर मारहाणीचा आरोप लावण्यात आला होता.
काय आहे प्रकरण ?
प्रकरण 2018 चे आहे. 19 फेब्रुवारीच्या रात्री दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश एका बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी गेले होते. बैठकीनंतर अंशु प्रकाश यांनी केजरीवालांसमोर आपच्या आमदारांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. वैद्यकीय चाचणीमधयेही त्यांना मारहाण झाल्याची पुष्टी झाली होती.