"मुख्यमंत्र्यांचं सभागृहातील भाषण चौकातल्या भाषणाप्रमाणे, त्यात महाराष्ट्र आलाच नाही’’
By बाळकृष्ण परब | Published: March 3, 2021 05:47 PM2021-03-03T17:47:27+5:302021-03-03T17:53:33+5:30
Devendra Fadanvis Criticize CM Uddhav Thackeray's Speech : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणाची चिरफाड केली आहे.
मुंबई - राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. (CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha) मात्र आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणाची चिरफाड केली आहे. मुख्यमंत्री आधी नवखे होते. मात्र त्यांना आता पद सांभाळून बरेच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही त्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातील फरक कळलेला नाही. मुख्यमंत्री आजच्या भाषणामधून सगळीकडे फिरून आले. मात्र अखेरपर्यंत त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आलाच नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Devendra Fadanvis Criticize CM Uddhav Thackeray's Speech in Assembly )
विधिमंडळामध्ये राज्यपालांच्या अभिषाणावर झालेल्या चर्चेवेळी विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले होते. दरम्यान, आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच भाजपा आणि केंद्र सरकारला लक्ष्य करत सरकारवरील आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता पद सांभाळून बरेच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही त्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातील फरक कळलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सगळे उल्लेख केले. ते पंजाबमध्ये गेले, चीनमध्ये गेले, दिल्लीत गेले, अमेरिकेत गेले, दक्षिणेतही पोहोचले. मात्र त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आला नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या विजेच्या जोडण्या तोडल्याबाबत दु:ख व्यक्त केले. मात्र महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज कापली त्यावर काहीही बोलले नाहीत. कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचारावही मुख्यमंत्र्यांनी एक चकार शब्द काढला नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.