संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे, देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 07:23 PM2020-08-17T19:23:45+5:302020-08-19T00:57:31+5:30
डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
नागपूर - डॉक्टरांसंदर्भात शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर टोकाची प्रतिक्रिया टाळली आहे. मात्र डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. सोमवारी फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नागपुरसह राज्यात 'कोरोना'मुळे वाढणारे मृत्यू हे गंभीर आहेत. शिवाय आॅगस्ट महिन्यात 'कोरोना'बाधितांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता राज्यभरात चाचण्यांची संख्या वाढविणे अनिवार्य झाले आहे. नागपुरसारख्या शहरात दररोज पाच हजारांहून अधिक संशयितांची चाचणी झाली पाहिजे. चाचण्या वाढल्यानंतर रुग्णांची संख्या वाढेल व त्यांच्यासाठी तशी व्यवस्थादेखील करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.
पुढील महिन्याभराचा काळ नागपुरसाठी गंभीर
नागपुरात मृत्यूचे व 'कोरोना'बाधितांचे प्रमाण वाढलेले आहे. यासंदर्भात योग्य नियोजन करुन पावले उचलायला हवे. एकूणच पुढील महिन्याभराचा काळ नागपुरकरांसाठी गंभीरच आहे. लवकर निदान होणे गरजेचे आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'जम्बो सेंटर'कामाचे नाही
नागपुरात 'कोरोना'वर उपचारासाठी 'जम्बो सेंटर' कामाचे राहणार नाही. त्यापेक्षा विकेंद्रीकरण करत मध्यम स्वरुपाचे केंद्र उभारले गेले पाहिजे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांना घरीच ठेवून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. यासाठी डॉक्टर 'व्हिडीओ कॉल'च्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. तर उरलेल्या ३ ते ४ टक्के गंभीर रुग्णांसाठी उपचाराची व्यवस्था उभी झाली पाहिजे, अशी सूचना मी केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. खाजगी संस्थांसोबत 'कोव्हिड केअर सेंटर' उभारता येतील. आवश्यकता भासली तर 'नॉन कोव्हिड' इस्पितळांना त्यांच्यासोबत जोडता येईल. थोडी तयारी केली तर २० ते २५ दिवसात स्थिती नियंत्रणात येईल, असेदेखील ते म्हणाले.
राहुल गांधी यांना गंभीरतेने घेत नाही
'फेसबुक'संदर्भातून राहुल गांधी यांनी भाजपावर आरोप लावले आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता आम्ही राहुल गांधी यांना गंभीरतेने घेत नाही असे उत्तर त्यांनी दिले. राहुल गांधी काहीही आरोप लावतात. त्यांना आम्हीच काय कुणीही गंभीरतेने घेत नाही, असे फडणवीस म्हणाले.