देवेंद्र फडणवीसांचा घणाघात; बाळासाहेबांच्या काळातला ‘सामना’ अन् आताची अवस्था सांगितला फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 10:24 AM2020-07-08T10:24:35+5:302020-07-08T10:33:07+5:30
आम्ही सरकार पाडण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. सरकार पाडण्याची घाई नाही असं वारंवार आम्ही सांगतोय पण चोराच्या मनात चांदणे अशी शिवसेनेची अवस्था आहे,
मुंबई – शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. त्याला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीनं ५ वर्ष जरुर सरकार चालवावं त्यांना शुभेच्छा आहेत. पण सामना एवढा अंतर्विरोध कुठेच झाला नाही, रोज आपली भूमिका बदलतात असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.
याबाबत टीव्ही ९ शी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामनानं कधी पवारांविरोधात लिहिलं कधी बाजूने लिहिलं, राज्यपालांविरोधात लिहिलं परत बाजूने लिहिलं, सातत्याने भूमिका बदलत असतात. सामनाला स्वत:चा बेस नाही, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातल्या ‘सामना’ची आज काय अवस्था झाली आहे. भूमिका नसणारा सामना, लांगूनचालन करणारा सामना, त्यावर काय प्रतिक्रिया देणार? त्यांना काय लिहियाचं ते त्यांचे त्यांना लखलाभ आहे असा टोला शिवसेनेला लगावला.
तसेच आम्ही सरकार पाडण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. सरकार पाडण्याची घाई नाही असं वारंवार आम्ही सांगतोय पण चोराच्या मनात चांदणे, म्हणून त्यांना रोज सरकार पडणार नाही असं सांगावे लागत आहे. त्यांच्या अंतर्विरोधामुळे हे सरकार एकरुप नाही असं समाज मनाची अवस्था आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
सामना अग्रलेखात काय म्हटलं?
मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा गोंधळ झाला व त्या बदल्यांतून अविश्वासाचे वातावरण उघड झाले, असे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यात तथ्य आहे असे वाटत नाही व त्याबाबत मनधरणी वगैरे करण्यासाठी गृहमंत्री देशमुख पवारांना घेऊन ‘मातोश्री’वर पोहोचले, असे सांगणे व छापणे हेच मुळी मानसिक गोंधळाचे लक्षण आहे. दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल, सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे. सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँगेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’ शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? असा सवाल विरोधकांना विचारण्यात आला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
…तर देशाचं राजकारण ठिसूळ पायावर उभं आहे असं समजावं; शिवसेनेचा फडणवीसांना चिमटा
राजगृह निवासस्थान तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला
५ दिवसांत २ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ; रुग्णालयाच्या भोंगळ कारभारानं कुटुंबाला मनस्ताप
आता २ वर्षात मिळणार एमसीए कोर्सची पदवी; एआयसीटीईचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय