“म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती”; फडणवीसांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 09:12 PM2021-07-04T21:12:28+5:302021-07-04T21:14:20+5:30
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
मुंबई: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण यावरून राज्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्ष भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तर, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही जोरदार झडत आहेत. दोन्ही आरक्षणांच्या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात बोलताना संन्यास घेण्याची भाषा केली होती. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis replied sanjay raut over retirement statement)
राज्यात सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. गरज पडली, तर मी त्यांची भेट घेईन. राज्याला आणि देशाला त्यांची गरज आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. याला आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”
यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार
ज्यावेळी एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा विचारपूर्वकच बोलतो. मला माहिती आहे की, संन्यास घ्यायची गरजच येणार नाही. पण जे करण्यासारखे आहे ते हे करत नाहीत. म्हणून मी तसे बोललो आणि राऊत म्हणतात तेही खरेच आहे, राज्याच्या राजकारणाला सगळ्यांचीच गरज आहे. माझीही गरज आहे, त्यांचीही गरज आहे. राजकारण एका पक्षाचे नसते. राजकारणात विरोधकही पाहिजेत. सगळ्याच प्रकारच्या लोकांची गरज आहे यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
दरम्यान, संजय राऊत एक असे व्यक्ती आहेत, जे सकाळी काही सांगतात, दुपारी काही सांगतात, संध्याकाळी अजून काही सांगतात आणि दुसऱ्या दिवशी तिसरेच काहीतरी सांगतात. त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही आपले मत बनवायला लागलो आणि तुम्हीही बातमी बनवायला लागलात, तर तुमची बातमी योग्य होणार नाही, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना काढला.