कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 06:00 PM2020-08-15T18:00:30+5:302020-08-15T19:08:40+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
पुणे : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सध्या राजकारण सुरु आहे. याप्रकरणी भाजपा नेते नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, यावर भाजपाकडून कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, "मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. बिहार आणि मुंबई पोलिसांची तुलना होऊ शकत नाही. अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करु नये", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याचबरोबर, महाविकास आघाडीच्या कारभाराचे विश्लेषण करायची ही वेळ नाही. मात्र सरकारने कारभार नीट चालवावा. त्यांच्यात अंतर्गत मोठ्या प्रमाणात भांडण सुरु आहे. सरकारमध्ये नेमके काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. मात्र बदल्यासंदर्भात अनाकलनीय सुरु आहे. जे ऐकायला मिळते ते भयंकर आहे. राज्याच्या डिजी यांनी चुकीच्या बदल्या करणार नाही, आता बदल्या करण्याची गरज नव्हती असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याशिवाय, गेल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर फटकारले होते. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पार्थ पवारांचा विषय पवार कुटुंबीयांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.