"पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, तर…” देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला असा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:36 AM2021-07-28T11:36:43+5:302021-07-28T11:41:53+5:30
Devendra Fadnavis News: भविष्यात पूर येऊ नये यासाठी पुराचा धोका असलेल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गाव आणि शहरांच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती
मुंबई - गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठी आर्थिक हानी झाली होती. दरम्यान, भविष्यात पूर येऊ नये यासाठी पुराचा धोका असलेल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गाव आणि शहरांच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, असे सांगितले. तसेच पूरस्थिती रोखण्यासाठी वेगळा पर्याय सुचवला आहे. (Devendra Fadnavis Says,"A protective wall is not a solution to prevent floods, but A diversion canal is a good option'')
मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण भिंत बांधण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने काय ठरवले याची मला काही कल्पना नाही. मात्र संरक्षक भिंत हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. भिंत बांधली तरी त्याच्यावरून पाणी येणार. किंवा ते आऊटलँकिंग करणार, कारण या पाण्याचा वेग आणि दाब अधिक असेल. जे पाणी पावसाचं नाही. आपण पाऊस वाढल्यानंतर जेव्हा धरणाचा विसर्ग करतो तेव्हा चारही बाजूंनी पाणी एकत्र येतं. आपण एखाद्या ठिकाणी भिंत बांधून त्याचा फायदा होईल. मात्र यापेक्षा आमच्या सरकारच्या काळात निर्णय घेतल्याप्रमाणे डायव्हर्जन कॅनॉल तयार करून पुराचा धोका असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात नेला येईल. त्यासंदर्भात वर्ल्ड बँकेशी आपण चर्चा केली होती. त्याला तत्त्वता मान्यताही मिळाली होती. तो प्रकल्प सरकारने पुढे नेल्यास अधिक फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.
संरक्षक भींत उभारणे हा उपाय नाही, तर पाणी वळवून ते दुष्काळी भागात नेणे, हाच उत्तम पर्याय आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 27, 2021
(माध्यमांशी संवाद । मुंबई । दि. 27 जुलै 2021)#KonkanFloods#MaharashtraFloodspic.twitter.com/RTwMfvplXy
दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये वारंवार पूर येतात. पूररेषा वारंवार ओलांडणाऱ्या नद्यांभोवती गाव आणि वस्त्यांच्या ठिकाणी संरक्षक भिंती उभारता येईल का? याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अधिकारी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. या निर्णयानुसार महाडमधील सावित्री नदी आणि चिपळूणमधील वशिष्ठी नदीला संरक्षक भिंत बांधण्यासा प्राधान्य दिले जाणार आहे.