पहाटेच्या सरकारबाबत फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता पहाटेचे नाहीतर...

By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 12:32 PM2020-11-23T12:32:17+5:302020-11-23T12:59:47+5:30

Devendra Fadanvis News : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पहाटे शपथ घेऊन स्थापन झालेल्या सरकारबाबत विचारले असता त्यांनी त्याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis's reaction to the morning government; Said... | पहाटेच्या सरकारबाबत फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता पहाटेचे नाहीतर...

पहाटेच्या सरकारबाबत फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता पहाटेचे नाहीतर...

googlenewsNext
ठळक मुद्देआता ज्यावेळेस सरकार पाहायला मिळेल तेव्हा ते पहाटेचे सरकार पाहावे लागणार नाहीतर योग्य वेळेचे सरकार पाहायला मिळेलत्या अल्पकालीन सरकारबाबत एक पुस्तक लिहित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले

औरंगाबाद - गतवर्षी राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने भल्या पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात भूकंप आणला होता. मात्र भल्या पहाटे शपथ घेतलेले हे सरकार अल्पजीवी ठरले होते. दरम्यान, या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या सरकारबाबत विचारले असता त्यांनी त्याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पहाटेच्या शपथविधीबाबत विचारण्यात आले तेव्हा फडणवीस म्हणाले की, आता ज्यावेळेस सरकार पाहायला मिळेल तेव्हा ते पहाटेचे सरकार पाहावे लागणार नाही तर योग्य वेळेचे सरकार पाहायला मिळेल. दरम्यान, त्या अल्पकालीन सरकारबाबत एक पुस्तक लिहित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील सरकार अजून चार वर्षे काय २० वर्षे चालेल या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरीदेखील त्यांना हे माहिती आहे की, जनतेने त्यांना निवडून दिलेले नव्हते. हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे. त्यामुळे मी त्याबाबत अधिक काही बोलणार नाही.


बरोब्बर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व राजकीय घडामोड घडली होती. राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवून महाविकास आघाडी आकारास येत असल्याचे निश्चित झाले असतानाच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र शरद पवारांच्या खेळीमुळे हे पहाटेचे सरकार अल्पजीवी ठरले होते. मात्र या घटनेने महाराष्ट्राचे राजकारण बदलले होते.

महाविकास आघाडीचे सरकार येणार म्हणून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते निश्चिंत झाले असतानाच २२ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत अनेक घडामोडी घडून २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. भाजपा आणि अजित पवारांचे समर्थक आमदार यांच्या पाठिंब्याने हे सरकार स्थापन झाल्याचे सांगण्यात आले होते. हे वृत्त समोर येताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र या सर्व गदारोळात शरद पवार यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या एकेका आमदाराला आपल्या गोटात आणण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशीपर्यंत बहुतांश आमदार पुन्हा पवारांकडे दाखल झाले. अखेरीस या सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. तिथे झालेल्या सुनावणीत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि या औटघटकेच्या सरकारची अखेर झाली.

Web Title: Devendra Fadnavis's reaction to the morning government; Said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.