भल्या पहाटे मंत्री धनंजय मुंडेंचा माध्यमांना चकवा; खासगी गाडी, काळ्या काचा अन् विना सुरक्षा ताफा...
By प्रविण मरगळे | Published: January 14, 2021 10:00 AM2021-01-14T10:00:31+5:302021-01-14T10:03:07+5:30
Dhananjay Munde Rape Allegation: मंत्री नवाब मलिक यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप कौटुंबिक आहेत, त्यावर तेच बोलू शकतात असं सांगत हात काढून घेतले आहेत.
मुंबई – बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय संकट निर्माण झालं आहे. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, याप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही भाजपाच्या महिला आघाडीनं दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे एकाकी पडल्याचं चित्र दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाकडूनही ठोसपणे कोणीही धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभं राहिलं नाही.
मंत्री नवाब मलिक यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप कौटुंबिक आहेत, त्यावर तेच बोलू शकतात असं सांगत हात काढून घेतले आहेत. रेणु शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडेंवर बॉलिवूडमध्ये संधी देतो या बहाण्याने बलात्काराचे आरोप केले आहेत, त्यामुळे राजकारणातील या तरूण नेत्याची कारकिर्द धोक्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्याचसोबत अजित पवार, छगन भुजबळ यासारख्या बड्या नेत्यांचीही भेट घेणं सुरु आहे.
त्यातच मीडियाचा ससेमिरी चुकवण्यासाठी धनंजय मुंडे भल्या पहाटे मलबार येथील शासकीय बंगल्यात दाखल झाले, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे धनंजय मुंडे यांच्यामागे आहेत, या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. यातच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या मुलांबाबत माहिती लपवली असल्याचा आरोप केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावरही टांगती तलवार कायम आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले, या गाडीच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. यात आतमध्ये कोण बसलं आहे हेदेखील दिसत नव्हते, इतकचं नव्हे तर कोणत्याही सुरक्षेचा ताफा न घेता धनंजय मुंडे यांनी माध्यमांना चकवा देत मुंबईतील शासकीय निवासस्थानी एन्ट्री केली.
आमदारकी रद्द होणार का? कायदेतज्ज्ञांना वाटतं...
लोकप्रतिनिधी विषयक कायद्यानुसार निवडणूक लढविणाऱ्यांनी कायदेशीर पत्नी आणि अपत्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार मुंडे यांनी पत्नी आणि त्यांच्यापासून झालेल्या तीन मुलींची नावे प्रतिज्ञापत्रात दिलेली आहेत. मात्र त्यांनी आपणास आणखी दोन मुले असून ती दुसऱ्या महिलेपासून झाली असल्याची कबुली दिली आहे. त्या महिलेसोबत परस्पर सहमतीने आपण संबंधात होतो, असेही म्हटले आहे. त्यांचा हा ‘कबुलीनामा’च त्यांना अडचणीचा ठरू शकतो, असे काही कायदेतज्ज्ञांना वाटते. तर काहींच्या मते विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या अपत्यांची नावे प्रतिज्ञापत्रात देण्याची आवश्यकता नाही.
विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या अपत्याची माहिती देण्याचा कोणताही नियम नाही. तसेच मुलांना आपलं नावं देणं म्हणजे त्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलाच पाहिजे असे नाही. यामुळे धनंजय मुंडे यांनी माहिती लपविली, असे म्हणता येणार नाही. तसेच या मुद्यावरून निवडणूक आयोग कारवाई करेल असे वाटत नाही. - उल्हास बापट, ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ
मुंडे यांचे कायदेशीर लग्न झालेले असताना त्यांनी दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवले. याबाबत त्यांची पत्नीच तक्रार करु शकते. परंतु पत्नीची अथवा त्या महिलेची या संदर्भात तक्रार दिसत नाही. मला वाटतं मुलांची माहिती लपविणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. कोणी तक्रार केली तर निवडणूक आयोग दखल घेऊ शकेल. - आसिम सरोदे, विधिज्ञ