धनंजय मुंडे जनता दरबाराला दांडी मारणार?; ‘चित्रकूट’ बंगल्यातूनच शासकीय कारभार हाकणार
By प्रविण मरगळे | Published: January 14, 2021 01:05 PM2021-01-14T13:05:06+5:302021-01-14T13:08:11+5:30
धनंजय मुंडे यांनी बॉलिवूडमध्ये संधी देतो या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याचं महिलेचे म्हणणं आहे.
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. सरकारमधील मंत्र्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने ठाकरे सरकार वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. धनंजय मुंडे यांचे हे कौटुंबिक प्रकरण असून त्याचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीनेही धनंजय मुंडे प्रकरणात सावध प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी बॉलिवूडमध्ये संधी देतो या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याचं महिलेचे म्हणणं आहे. तर करूण शर्मा नावाच्या महिलेसोबत माझे परस्पर संबंध होते, तिच्या बहिणीने ब्लॅकमेलिंग आणि बदनामीसाठी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत असं स्पष्टीकरण निवेदनाच्या माध्यमातून दिलं आहे. मात्र अद्याप धनंजय मुंडे यांनी माध्यमासमोर येऊन प्रतिक्रिया दिली नाही. मीडियाला चकवा देण्यासाठी भल्या पहाटे खासगी कारने चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले, त्यावेळी त्यांच्यासोबत कोणताही सुरक्षा ताफा नव्हता.
दरम्यान, सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी समर्थकांची गर्दी आहे, त्याचसोबत सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकाचं सत्रही सुरु आहे. त्यामुळे शासकीय कामकाज धनंजय मुंडे बंगल्यावरून हाकत आहे. मीडियापासून दूर राहण्याचं मुंडेंनी पसंत केले आहे. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दुपारी २ ते ४ मध्ये धनंजय मुंडे यांचा जनता दरबार आहे, त्यामुळे या दरबाराला ते हजेरी लावणार का यावर प्रश्चचिन्ह आहे. त्याचसोबत मुंडे यांनी मकर संक्रांतीनिमित्त ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात म्हटलंय की, कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, तीळ गुळ घ्या आणि गोड बोला असं त्यांनी म्हटलं आहे.
कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत! मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तीळ गुळ घ्या आणि गोड बोला. pic.twitter.com/w9kebdEYYJ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 14, 2021
धनंजय मुंडे काय म्हणाले?
२०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.
या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.