"धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवले नाहीत, ही मर्दपणाची बाब"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 06:04 PM2021-01-15T18:04:30+5:302021-01-15T18:08:02+5:30
Dhananjay Munde News : धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवून ठेवले नाही, हे संबंध त्यांनी कुटुंब आणि पत्नीपासून लपवून ठेवलेले नव्हते ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारीक अर्थाने घ्यायची म्हटल्यास मर्दपणाची आहे
मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं प्रकरण सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. तर प्रकरणाच्या चौकशीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकंदरीत महाविकास आघाडीकडून घेतली जात आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंना विविध स्तरांवरून पाठिंबाही मिळत आहे. आता मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवून ठेवले नाही, हे संबंध त्यांनी कुटुंब आणि पत्नीपासून लपवून ठेवलेले नव्हते ही बाब उमदेपणाची किंवा अलंकारीक अर्थाने घ्यायची म्हटल्यास मर्दपणाची आहे, असे खेडेकर यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर करताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले आहे. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण, स्पष्टता आणि सहजता यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे. मी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर करतो. मी आणि धनंजय मुंडे एकमेकांना नावानिशी ओळखत नाही. मात्र मी त्यांच्या पाठीशी स्वेच्छेने उभा राहत आहे, असे पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा हे २००३ पासून संबंधांमध्ये होते. ही बाब त्यांच्या मतदारसंघातील सर्वांना तसेच कुटुंबीयांना माहिती होती. करुणा शर्मा यांनीही सोशल मीडियावर आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याची कबुली दिलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यात संबंध निर्माण झाले असण्याची शक्यता कमी आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबतचे संबंध जाहीरपणे स्वीकारले आहेत. त्यामुळे रेणू शर्मांसोबत शारीरिक संबंध असते तर त्यांनी ते कबुल केले असते, असेही खेडेकर म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंधांना लपवून ठेवलेले नाही. त्यांनी हे संबंध आपल्या कुटुंबापासून आणि पत्नीपासूनही लपवले नव्हते. ही बाब उमदेपणाची आणि मर्दपणाची आहे. विवाहबाह्य नात्यांना नैतिक उंची आणि समाजमान्यता देणारी आहे, असा दावाही खेडेकर यांनी केला.
सध्या समाजात प्रतिष्ठित आणि सेलेब्रिटीचा दर्जा बाळगणारे पुरुष एकापेक्षा जास्त महिलांसोबत संबंध प्रस्थापित करतात आणि पहिल्या पत्नीला घटस्फोटासारख्या कायदेशीर हत्याराने दूर करतात. त्या महिलांच्या उर्वरित आयुष्याची राखरांगोळी करतात. समाज अशा महिलेवर झालेल्या अन्यायाला शोषणाला योग्य ठरवतो. अशावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांची कायदेशीर पत्नी लिव्ह इन रिलेशनशिपमधील सहकारी आणि एकूण पाचही अपत्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळली आहे ती असमानतेची किंवा अन्यायाची दिसत नाही. मात्र करुणा शर्मा ही त्यांची लिव्ह इनमधील सहकारी आणि रेणू शर्मा या महिलेचे स्वातंत्र्य त्यांनी मान्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले.