धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवारांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

By कुणाल गवाणकर | Published: January 14, 2021 02:56 PM2021-01-14T14:56:22+5:302021-01-14T14:57:57+5:30

नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवरून शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Dhananjay Munde likely to resign speculations after ncp chief sharad pawars statment | धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवारांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवारांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

googlenewsNext

मुंबई: गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार म्हणाले. 

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; आरोप गंभीर असल्याचं सांगत शरद पवार म्हणतात... 

सध्याच्या घडीला राष्ट्रवादीचे दोन मंत्री अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले असताना नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांवर शरद पवार यांनी भाष्य केलं. मात्र दोन्ही मंत्र्यांबद्दल बोलताना पवार यांनी घेतलेली भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. मलिक यांच्या जावयावर आरोप झाले आहेत. मलिक यांच्यावर व्यक्तिगत स्वरुपाचे कोणतेही आरोप नाहीत. त्यांच्या जावयावर झालेल्या आरोपासंबंधांत संबंधित यंत्रणेकडून कारवाई सुरू आहे, असं म्हणत पवार यांनी मलिक यांना अप्रत्यक्षपणे क्लीन चीट दिली.

अखेर मंत्री धनंजय मुंडेंना माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी घेरलं; बलात्काराच्या आरोपावर म्हणाले...

गेल्या २५ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात काम करताना मलिक यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाचे आरोप झालेले नाहीत असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी मुंडेंवरील आरोप मात्र गंभीर स्वरुपाचे असल्याचं म्हटलं. 'धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, विचारविनियम झाल्यावर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल,' असं पवार म्हणाले. त्यामुळे पक्षाकडून मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार यांनी सोडले मौन; राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट

''त्यासाठी सीएमची वाट पाहणार नाही, पक्ष निर्णय घेईल''
मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल, विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याची मागणीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं का, असा प्रश्न पवार यांनी विचारण्यात आला. त्यावर आधी पक्षातल्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलू. मग मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू, असं उत्तर पवार यांनी दिलं. याप्रकरणी निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार नाही. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मात्र तो घेत असताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि आरोपांचं गांभीर्य कमी होणार नाही, या गोष्टी लक्षात घेऊ, असं पवार यांनी सांगितलं.

Web Title: Dhananjay Munde likely to resign speculations after ncp chief sharad pawars statment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.