धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग काय त्यांना फासावर चढवायचं का? अनिल परबांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 04:07 PM2021-01-14T16:07:46+5:302021-01-14T16:08:37+5:30
Anil Parab : या सर्व गोष्टींची खुलासेवार चौकशी होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रकरणी काय तो निर्णय घेतील, असे अनिल परब यांनी सांगितले.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर आता राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणावर आरोप केले म्हणजे कारवाई होत नसते. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची कायद्यानुसार चौकशी होईल. त्यानंतर कादेशीर निर्णय घेतला जाईल. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आहेत. मग काय त्यांना लगेच फासावर चढवायचं का? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.
अनिल परब यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर भाष्य केले. यावेळी सर्व गोष्टी कायदेशीररित्या होतील. धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत, त्याबाबत धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. या सर्व गोष्टींची खुलासेवार चौकशी होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रकरणी काय तो निर्णय घेतील, असे अनिल परब यांनी सांगितले.
याचबरोबर, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर बोलताना सगळ्या गोष्टी कायदेशीर मार्गाने होतील, असे सांगितले. तक्रार करणे किरीट सोमय्या यांचा धंदा आहे. त्यांनी तक्रार केली म्हणून कारवाई करायची, हा एकाप्रकारे कुणावरही अन्याय होऊ शकतो. त्यामुळे कुणी काही म्हणू देत, सत्य बाहेर येऊ देत. त्यांनतरच काय तो निर्णय होईल, असेही अनिल परब म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारीला फेसबुकवर संबंधित महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग करणारे आणि खोटे आहेत, असे सांगत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.