'त्या' मुलांवरून धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 01:40 PM2021-01-13T13:40:38+5:302021-01-13T14:15:44+5:30
Dhananjay Munde affaire news: धनंजय मुंडे यांनी याचा कबुलीनामा फेसबुकवरच दिला आहे. या कबुलीनाम्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्री राहण्याच्या पात्रतेचे नाहीत, आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा आरोप आता भाजपाचे नेते करू लागले आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी असे झाल्यास भाजपाचेच नेते टेन्शनमध्ये येतील असे सांगितल्याने राजकीय रंग चढू लागला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का? निवडणूक आयोग त्यावर कारवाई करू शकतो का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मंगळवारचा दिवस राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी संशयकल्लोळाचा ठरला. एका तरुणीने त्यांच्यावर चित्रपटांत काम देण्याच्या नावाखाली वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप केला. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कोण? याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. या महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत आहोत," असा खुलासा केला होता. यावरून आता वेगळेच राजकारण रंगले आहे.
धनंजय मुंडे यांनी याचा कबुलीनामा फेसबुकवरच दिला आहे. ते म्हणतात, "एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना माहित होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे, ही मुलं माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे. सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे."
या कबुलीनाम्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्री राहण्याच्या पात्रतेचे नाहीत, आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा आरोप आता भाजपाचे नेते करू लागले आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी असे झाल्यास भाजपाचेच नेते टेन्शनमध्ये येतील असे सांगितल्याने राजकीय रंग चढू लागला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का? निवडणूक आयोग त्यावर कारवाई करू शकतो का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
प्रतिज्ञापत्रात तीन नावे कोणाची?
धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तीन मुलींची नावे दिलेली आहेत. मात्र, विवाहबाह्य संबंधातून दोन अपत्य असल्याची माहिती दिली नसल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामध्ये कायदेशीर पत्नीच्या नावाचा आणि तिच्यापासून असलेल्या तीन मुलींचा उल्लेख आहे. आमदारकी रद्द होण्याबाबत काही तज्ज्ञांनी मते नोंदविली आहेत.
राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी यावर मत मांडले आहे. ते म्हणाले की, विवाहबाह्य संबंधांमधून जन्मलेल्या अपत्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्याचा कोणताही नियम नाही. यामुळे धनंजय मुंडे यांनी माहिती लपविली असे होत नाही. मुलांना आपलं नाव देणं म्हणजे त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात झाला पाहिजे असे नाही. यामुळे निवडणूक आयोग यावर कारवाई करेल असे वाटत नाही. परंतू याचा राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ जे के तांदुळेकर यांनीही काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. ''धनंजय मुंडे यांनी उच्चन्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामुळे या प्रकरणावर जास्त बोलू शकत नाही. महिलेशी संमतीने संबंध व तिच्यापासून दोन मुले असल्याने, त्यांच्या शिक्षणाचा खर्च-नाव धनंजय मुंडे करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा होऊ शकत नाही. तसेच निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन मुलांची नाव न दिल्याने काही समस्या येणार नाही.'', असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाकडे कुणी तक्रार केल्यास कारवाई...
तर वकील असीम सरोदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सांगितले. धनंजय मुंडे यांचे कायदेशीर लग्न झाले आणि त्यांची कायदेशीर पत्नी आहे. त्यांनी लग्न केले नाही. ते 2006 पासून एका स्त्री सोबत ' विवाहासारख्या ' संबंधात राहतात पण ती त्यांची कायदेशीर बायको नाही. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागूच होत नाही. आणि एक बायको असतांना दुसऱ्या स्त्रीशी विवाहा-सारखे संबंध ठेवणे याविरोधत एक तर कायदेशीर पत्नी तक्रार करू शकते किंवा विवाहाशिवाय सहजीवनासरखे संबंध असलेली स्त्री तक्रार करू शकते. धनंजय मुंडेंच्या बाबतीत या दोन्ही स्त्रियांची काहीही तक्रार नाही. तसेच निवडणुकीच्या आधी उमेदवाराने जी माहिती माहिती द्यायची असते त्यामध्ये कायदेशीर बायकोची माहिती देणेच आवश्यक आहे. त्याअर्थाने धनंजय मुंडे यांनी बायको बद्दलची माहिती लपविली असे म्हणता येत नाही. पण मुलांची माहिती त्यांनी लपविली आहे. असे खोटे व दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. कुणी तक्रार केली तर निवडणूक आयोग याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे लोकप्रतिनिधीत्व म्हणजेच आमदारकी रद्द करू शकते. निवडणूक आयोगाने स्वतःहून अश्या प्रकरणांमध्ये गंभीर दखल घेतल्याची उदाहरणे नाहीत, असे ज्येष्ठ संविधान विश्लेषक कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.
यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी त्यांना बायको असल्याची माहिती न देताच प्रतीज्ञापत्र दाखल केले. खूप गाजावाजा झाला. मग पुढील निवडणुकीत मोदींनी बायको असल्याचे व लग्न झाल्याचे जाहीर केले. पण तेव्हाही मोदींवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मुलांबाबत माहिती न दिल्याने धनंजय मुंडेंवर निवडणूक आयोग कडक कारवाई करेल याबाबत साशंकता आहे, असेही सरोदे यांनी सांगितले.