बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे पोहोचले शरद पवारांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:19 PM2021-01-13T17:19:03+5:302021-01-13T17:22:02+5:30
सिल्व्हर ओकवर जाऊन घेतली शरद पवारांची भेट
मुंबई: गायक तरुणीनं बलात्काराचे आरोप केल्यानं संकटात सापडलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मुंडे यांनी शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याच बराच वेळ चर्चा झाल्याचं समजतं.
धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची भेटून आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली. त्याआधी त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्वत:ची भूमिका जनतेसमोर ठेवली होती. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर आज मुंडे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांच्यासोबत याबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांची भूमिका स्पष्ट केली.
'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार
रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. शर्मा यांनी पोलीस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅकमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांची बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलंही आहेत. त्यांची जबाबदारीदेखील मी घेतली आहे, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.
धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...”
माझ्या जवळच्या लोकांना आमच्या संबंधांबद्दल माहिती आहेत. तसंच कुटुंबालाही या सगळ्याची कल्पना आहे, असं मुंडेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे शरद पवारांनादेखील याची माहिती असं म्हटलं जातं आहे. अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंना पवारांनी नेमका कोणता सल्ला दिला याची माहिती अद्याप तरी उपलब्ध झालेली नाही. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.