आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक; आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा
By प्रविण मरगळे | Published: September 21, 2020 03:16 PM2020-09-21T15:16:32+5:302020-09-21T15:18:01+5:30
धनगर समाजाच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आगामी काळात सरकार आणि धनगर समाज हा संघर्ष अटळ आहे असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला आहे.
परभणी – राज्यात मराठा समाजासोबतच आता धनगर समाजही राज्य सरकारविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. राज्यात धनगर समाजाने एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी परभणी येथून आंदोलनाला सुरुवात केली आहे. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत परभणीतल्या प्रसिद्ध खंडोबा मंदिरात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी अभिषेक घातला. आरक्षणच्या अंमलबजावणीवरुन धनगर समाज राज्यभरात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे. धनगर समाज वेळोवेळी मोर्चे काढतोय, रस्त्यावर उतरतोय, त्यामुळे सरकारने धनगर समाजातील युवकांना एसटी आरक्षणाचा दाखला द्यावा, धनगर समाजासाठी सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, कोर्टामध्ये सरकारकडून कोणताही चांगला वकील दिला नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ मंडळीशी बोला, धनगर समाजातील नेत्यांशी चर्चा करा आणि लवकरात लवकर युवकांना एसटी आरक्षणाचा दाखला द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
तसेच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही पत्र लिहिलं आहे. या पत्रात धनगर समाजाच्या १० प्रमुख मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकार स्थापन होऊन खूप काळ लोटला आहे. या कालावधीत झालेल्या अधिवेशनात धनगर समाजाला एक पैसाही दिला नाही. चालू असलेल्या योजना बंद केल्या. धनगर आरक्षण या विषयावर एकही बैठक झालेली नाही.यावरुन सरकार धनगर समाजाच्या मागणीवर गंभीर नाही असं दिसत आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
त्याचसोबत लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा द्यावे, मागील सरकारने दिलेल्या आदिवासी योजना धनगर समाजालाही लागू कराव्यात. कोरोना परिस्थितीमुळे धनगर समाज शांत आहे, समाज झोपला आहे असं सरकारने समजू नये. धनगर समाज तीव्र आंदोलन करण्याच्या मन:स्थितीत आहे. धनगर समाजाच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आगामी काळात सरकार आणि धनगर समाज हा संघर्ष अटळ आहे असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक
सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला, यावेळी आसूड आंदोलन करून परत निघालेल्या कार्यकर्त्यांनी, पार्क चौकातील एटीएम सेंटर व जगदंबा चौकातील एका कपड्याच्या दुकानांवर दगडफेक करून संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील विविध विविध भागातून लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्या घरावर आसूड मोर्चा काढला होता. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी 'एक मराठा लाख मराठा'... अशा घोषणा देत निदर्शने केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीमध्ये निदर्शने करण्यात आली. निदर्शने झाल्यानंतर मराठा समाजाचा मोर्चा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती मंदीर येथील घरावर काढण्यात आला.
मराठ्यांना ओबीसीत सामावून घ्यावं
ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर चांगले आहे. २०११ च्या जगणनेनुसार ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण कमी आहे. पण जर वेळ आली तर ओबीसी समाज काळीज मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देऊ शकतो. आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. त्याचसोबतच केंद्राची आता पॉलिसी पाहिली तर अनेक गोष्टी खासगीकरणाकडे जात असताना आरक्षण महत्त्वाचं असताना युवकांनी गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला पाहिजे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.