विरोधी पक्षांचा मतदान यंत्रांवर अविश्वास; पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 07:01 AM2019-04-15T07:01:11+5:302019-04-15T07:01:21+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ मतदारसंघांत मतदान पार पडल्यानंतर काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी रविवारी मतदान यंत्रांवर पुन्हा एकदा अविश्वास व्यक्त केला
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ मतदारसंघांत मतदान पार पडल्यानंतर काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी रविवारी मतदान यंत्रांवर पुन्हा एकदा अविश्वास व्यक्त केला आणि निवडणूक नि:ष्पक्ष व विश्वासार्ह व्हावी, यासाठी किमान ५० टक्के मतदान यंत्रांमधील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी व्हायलाच हवी, ही मागणी घेऊन पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालायात जाण्याचे ठरविले.
याबाबतीत विरोधी पक्षांच्या वतीने हिरिरीने पुढाकार घेणारे तेलगु देसम पक्षाचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एम. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन पहिल्या टप्प्यातील मतदानात मतदान यंत्रे मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्याची तक्रार केली होती. तोच विषय पुढे नेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेऊन आपली रणनीती ठरविली व नंतर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आडमुठेपणावरही टीका केली.
नायडू म्हणाले की, आयोग प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सरधोपटपणे निवडलेल्या एका मतदानयंत्रातील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी करण्याचे ठरविले होते. त्याऐवजी किमान ५० टक्के यंत्रांची पडताळणी व्हावी यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. न्यायालयाने पाच यंत्रांच्या पडताळणीचा आदेश दिला. पण खास करून पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर न्यायालयाच्या आदेशाने आमचे समाधान झालेले नाही. त्यामुळे आधीच्या आदेशाचा फेरविचार करण्यासाठी पुन्हा न्यायालयात जाऊ.
काँग्रेसतर्फे डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, पुन्हा न्यायालयात जाण्यासोबतच आम्ही यावर देशव्यापी आंदोलन करू. पहिल्या फेरीच्या मतादानाच्या वेळी मतदानयंत्रांबद्दल ज्या मोठया प्रमाणावर तक्रारी आल्या त्या पाहता ५० टक्के ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणीची अधिक गरज निर्माण झाली आहे. निवडणूक आयोग याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याचेही ते म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, मतदानयंत्रांवरचा लोकांचा विश्वास उघड चालला आहे व त्यांना पुन्हा पूर्वीसारखे मतपत्रिकेने मतदान हवे आहे. पण आता ऐनवेळी हा बदल करण्यास वेळ अपुरा असल्याने ५० टक्के ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी हाच उत्तम पर्याय आहे. मतदानयंत्रांमध्ये यांत्रिक बिघाड होत नाही तर भाजपला विजयी करण्यासाठी प्रोग्रामिंग करून यंत्रांमध्ये हेराफेरी केली जात आहे, असा त्यांनी आरोप केला.
>‘ही तर पराभवाची कबुली’
विरोधी पक्षांची ही पत्रकार परिषद म्हणजे ‘महागठबंधन’ची निवडणुकीआधीच पराभवाची कबुली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली. प्रवक्ते जीएलव्ही नरसिंह राव म्हणाले की, विरोधी पक्षांकडे सुशासनाचा कोणताही अजेंडा नाही. लोकांना स्फूर्ती देणारे नेतृत्व नाही. नकारात्मकता हेच या पक्षांना एकत्र आणणारे समान सूत्र आहे. विकासाच्या वाटेवर निघालेल्या देशाला मागे खेचणे एवढेच त्यांचे काम आहे.